
मोदींच्या वाढदिनी लसीकरणाचा विक्रम! भारतात दिवसभरात दिले दोन कोटी डोस
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही आहे. सध्या परिस्थिती हाताबाहेर नसली तरीही कोरोनाचं संकट केंव्हाही रौद्ररुप धारण करु शकतं. या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या या कार्यक्रमाअंतर्गत 77 कोटी लसीकरण पार पाडण्यात आलं आहे. भारतामध्ये आज दुपारी दीड वाजेपर्यंत 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला होता. तर आता या आकडेवारीने 2 कोटींचा टप्पा गाठला आहे. सायंकाळच्या आतच दोन कोटींचा लसीकरणाचा टप्पा एका दिवसांत गाठण्याचा हा विक्रम देशात पहिल्यांदाच घडला आहे.
याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करुन देताना म्हटलंय की, व्हॅक्सिन सेवा करताना आज देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देशवासीयांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना ही भेट दिली आहे. मोदींच्या वाढदिनी आज भारताने नवा विक्रम प्रस्थापित करत एका दिवसातच 2 कोटी लसींचा ऐतिहासिक असा आकडा पार केला आहे
तर दुसरीकडे या लसीकरण कार्यक्रमामध्ये आता आणखी एक विक्रम होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत एक अब्ज लसीकरण पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा डोस असे लसीकरण समाविष्ट असेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारतात काल रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 77,24,25,744 लसीकरण पार पडले आहे.