धक्कादायक! देशात मे महिन्यात होते ६४ लाख रुग्ण; ICMR सिरो सर्वेक्षणाची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

सारा देश लॉकडाउनमध्ये बंद होता, त्यावेळीच लोकसंख्येच्या ०.७३ टक्के प्रौढ म्हणजेच जवळपास तब्बल ६५ लाख लोक कोरोना संक्रमित झाले होते, असे आयसीएमआरच्या सिरो सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

नवी दिल्ली - कोविड-१९ महामारीचा कहर देशात वाढत चालला असतानाच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आपला पहिल्या सिरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर केले. यंदा मे महिन्याच्या प्रारंभी म्हणजे जेव्हा सारा देश लॉकडाउनमध्ये बंद होता, त्यावेळीच लोकसंख्येच्या ०.७३ टक्के प्रौढ म्हणजेच जवळपास तब्बल ६५ लाख लोक कोरोना संक्रमित झाले होते, असे आयसीएमआरच्या सिरो सर्वेक्षणात दिसून आले आहे. आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष या महिन्याअखेर जारी होण्याची शक्‍यता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आज सकाळपर्यंत (११ सप्टेंबर) कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ लाख ६२ हजाराहून जास्त आहे. ३५ लाख ४२ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ताज्या सरकारी आकड्यांच्या पार्श्‍वभूमीवर चार महिन्यांपूर्वी केलेल्या या सिरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष चकित करणारे आहेत.

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या प्रारंभी जेव्हा एका चाचणीमागे एक सक्रिय रुग्ण आढळत असे त्याच वेळी ८२ ते १३० लोक कोरोना संक्रमित होते. अशा रुग्णांची संख्या त्यावेळी ६४ लाख ६८ हजार ३८८ होती. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ४८.५ टक्के लोक कोरोनाग्रस्त होते. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणारे डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस आदी कोरोनायोद्ध्यातील १८.७ टक्के लोकांना या विषाणूची बाधा झाली होती.

हे वाचा - स्थिती गंभीर! पहिल्यांदाच भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाजवळ

केंद्र सरकारतर्फे मे महिन्यामध्ये, कोरोनाचे जास्त संक्रमण मुख्यतः शहरी भागात असल्याचे दावे वारंवार केले गेले होते. प्रत्यक्षात आयसीएमआरचे हे सर्वेक्षण ग्रामीण भागात प्रामुख्याने केले गेले आणि नेमक्‍या ग्रामीण भारतातच तेव्हा तब्बल ६९.४ टक्के रुग्ण आढळले होते. सरकारने मे महिन्यात ज्या जिल्ह्यांना कोरोनापासून पूर्ण मुक्त असे जाहीर केले होते, त्यावेळीही त्या जिल्ह्यांत कोरोना संक्रमित लोक होतेच. त्यांची संख्या कमी असली तरी तेथे चाचण्यांची सुविधाच नव्हती. तसेच त्यावेळी देशातही चाचण्यांची संख्या कमी होती. जेथे कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत संशय आहे तेथील चाचण्या वाढवाव्यात,अशीही सूचना या अहवालात करण्यात आली आहे.

सीरो सर्वेक्षणानुसार
कोठे किती रुग्ण (टक्क्यांत)
ग्रामीण - ६९.४
शहरे (झोपडपट्टया)- १५.९
शहरे (अन्य वस्ती)- १४.६

वयोगटानुसार सक्रिय रुग्णसंख्या (टक्क्यांत)
१८ ते ४५- ४३.३
४६ ते ६०- ३९.५
६० च्या वरचे- १७.२

अठरा वर्षापुढील नागरिकांच्या चाचण्या
११ मे ते ४ जून या काळात झालेल्या सिरो सर्वेक्षणात १८ वर्षांपुढील नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. २१ राज्यांतील ७० जिल्ह्यांतील ७०० गावे, वॉर्डमधील २८ हजार नमुने चाचण्यांसाठी गोळा करण्यात आले होते. यातील १८१ म्हणजे फक्त २५.९ शहरी भाग होते. सर्वेक्षणाचे चार गट करण्यात आले असून त्यामध्ये शून्य रुग्ण, कमी रुग्ण, मध्यम रुग्णसंख्या आणि जास्त रुग्ण असे गट आहेत. 

हे वाचा - पोस्टातील 'या' योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा लाखो रुपये!

ऑक्सिजनसाठी मारामारी
कोरोनाकाळात अन्य राज्यांकडून मागणी असल्यास ऑक्सिजनचा पुरवठा थांबवू नये, असे केंद्र सरकारने राज्यांना बजावले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्यातील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रकरणानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कोणत्याही राज्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात अडथळे आणू नयेत. कोरोना रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन मिळणे हे जीव वाचण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india likely had 64 lakh covid 19 infections in may icmrs sero survey