मोदी सरकारची ट्विटरला दणका देण्याची तयारी; KOO अ‍ॅपला मिळणार पसंती

टीम ई सकाळ
Monday, 15 February 2021

भारत सरकार यापुढे सर्व प्रकारची माहिती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याआधी कू अ‍ॅपवर शेअर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालय, मंत्री यांचे सोशल मीडियावर अकाउंट आहे. या अकाउंटवरून सरकारने घेतेले निर्णय आणि इतर माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या केलं जात. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर सरकारची अधिकृत अकाउंट आहेत. दरम्यान, आता आत्मनिर्भर भारत मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कू अ‍ॅपचा वापर वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत असल्याचं समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचेसुद्धा कू अ‍ॅपवर खाते उघडले जाण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच मंत्रिमंडळासह इतर नेत्यांचेही खाते कू वर सुरु केलं जाऊ शकते. भारत सरकार यापुढे सर्व प्रकारची माहिती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याआधी कू अ‍ॅपवर शेअर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हे वाचा - पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा; भारताच्या मॅपिंग पॉलिसीत बदल

सरकारकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात येणारी माहिती यापुढे कू अ‍ॅपवर सर्वात आधी शेअर केली जाऊ शकते असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे. असा निर्णय घेतला गेल्यास 1 ते 3 तास आधी कू अ‍ॅपवर माहिती शेअर केली जाईल. त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा - प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्यावर; गाडीसाठी फायद्याचं कोणतं?

भारतात Tiktok, PUBG Mobile यासह इतर अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर अनेक भारतीय अ‍ॅप डेव्हलपर्सनी परदेशी अ‍ॅप्सना देशी पर्यायी अ‍ॅप्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. यात अप्रमेय राधाकृष्ण आणि त्यांच्या टीमने कू अ‍ॅप तयार केलं आहे. यामुळे भारतात ट्विटरला जोरदार टक्कर मिळेल असं म्हटलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india modi govt may make first choice for koo app