विरोधकांची महाआघाडी भाजपच्याच पथ्यावर पडेल

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधकांनी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू केली असताना केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी या संभाव्य आघाडीवर टीकास्त्र डागले आहे. या आघाडीतील मंडळी भ्रष्ट, जातीयवादी आणि धर्मवादी असून, तीच आता एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधकांनी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू केली असताना केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी या संभाव्य आघाडीवर टीकास्त्र डागले आहे. या आघाडीतील मंडळी भ्रष्ट, जातीयवादी आणि धर्मवादी असून, तीच आता एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या महाआघाडीमुळे भाजपला कसलाही फरक पडणार नसून, यामुळे भाजपचेच स्थान अधिक भक्कम होणार आहे. केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्ये आमचा पक्ष प्रमुख दावेदार बनेल, असेही त्यांनी नमूद केले. भविष्यामध्ये एकत्र येऊ पाहणाऱ्या मंडळींना मी आताच शुभेच्छा देतो. त्यांनी एक होत आम्हाला जागा मोकळी करून द्यावी. पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस एक झाल्यानंतर जी जागा निर्माण होईल ती आपोआप भाजपला मिळणार आहे. ही मंडळी दिल्लीत परस्परांना सहकार्य करत आहेत, कोलकत्यामध्ये ते काम करतात आणि केरळमध्ये मात्र विभक्त झाले आहेत. विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांना घाबरले असल्यानेच ते त्यांची प्रतिमा कलुषित करण्याचे काम करत आहेत; पण त्यांची ही कृत्ये त्यांच्यावरच बुमरॅंग होतील, असा विश्‍वास नायडू यांनी व्यक्त केला.

Web Title: india news national news bjp congress