भारत-पाक 18 वर्षांनंतर न्यायालयात आमनेसामने

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

कुलभूषण जाधवप्रकरणी आज सुनावणी
नेदरलॅंडमधील हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. हेरगिरीच्या आरोपावरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान सुमारे 18 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकमेकांसमोर पुन्हा एकदा आज (सोमवारी) उभे राहत आहेत. याआधी 1999 मध्ये पाकिस्तानी नौदलाचे विमान पाडल्याप्रकरणी भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने खेचले होते.

नेदरलॅंडमधील हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. हेरगिरीच्या आरोपावरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना भेटण्याची परवानगी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना 16 वेळा नाकारण्यात आली. हा व्हिएन्ना कराराचा भंग असल्याची याचिका भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात 8 मे रोजी केली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. दोन्ही देश या प्रकरणी न्यायालयासमोर बाजू मांडतील.

याआधी पाकिस्तानी नौदलाचे विमान भारतीय हवाई दलाने 10 ऑगस्ट 1999 ला पाडल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. यात पाकिस्तानी नौदलाचे 16 कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. हे विमान पाकिस्तानी हद्दीत भारतीय हवाई दलाने पाडल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी पाकिस्तानने केली होती; मात्र पाकिस्तानचा हा दावा 21 जून 2000 ला 14 विरुद्ध 2 मतांनी फेटाळण्यात आला. त्या वेळी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कार्यकक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्द्यावर पाकिस्तानची याचिका फेटाळण्यात आली होती.

कार्यकक्षेला भारताचा कायमच आक्षेप
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कार्यकक्षेला भारताने कायम आक्षेप घेतला आहे. पाकिस्ताने याआधी काश्‍मीर मुद्दा, कारगिल युद्ध, भारत- पाकिस्तान संबंध, सीमेवरील गोळीबार आदी मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केले होते; मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कार्यकक्षेचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. भारत आणि अन्य राष्ट्रकुल देशांमध्ये परस्पर करार झालेले असल्याने त्यांच्यातील संघर्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आल्याचे भारताने याआधीच्या प्रकरणांत स्पष्ट केले होते.

Web Title: india pakistan to confront in international court today