esakal | चिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona Updates

सलग पाचव्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. सध्या देशात २८ लाख १३ हजार ६५८ एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

चिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Corona Updates: नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना या भयानक महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. दररोज कोरोनाचे नवनवे रेकॉर्ड बनत चालले आहेत. गेल्या २४ तासात भारतात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. रविवारी (ता.२५) दिवसभरात भारतात तब्बल ३ लाख ५४ हजार हून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. जगभरातील ही उच्चांकी नोंद ठरली आहे.

भारतात रविवारी (ता.२५) दिवसभरात ३ लाख ५२ हजार ९९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ एवढी झाली आहे.

सलग पाचव्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. सध्या देशात २८ लाख १३ हजार ६५८ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २ लाख १९ हजार २७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन लाखाहून अधिकजणांना घरी पाठविण्यात आलं आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी दिवसभरात २ हजार ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १ लाख ९५ हजार १२३ वर पोहोचला आहे.

हेही वाचा: डोवाल यांच्या कॉलनंतर अमेरिका भारताच्या मदतीला तयार

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कोटी ९ लाख १६ हजार ४१७ जणांना लसीकरण करण्यात आलं आहे. रविवारी दिवसभरात १४ लाख २ हजार ३६७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत २७ कोटी ९३ लाख २१ हजार १७७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांत अनुक्रमे ३.४८ लाख, ३.४५ लाख, ३.३२ लाख, ३.१५ लाख कोरोना रुग्ण आढळून आले होते. आणि यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

हेही वाचा: West Bengal : मतदानावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळा - PM मोदी

अनेक देश भारताच्या पाठीशी

कोरोना संकटात सुरवातीला भारताने अनेक देशांना मदतीचा हात दिला. रेमडेसिव्हिर ते कोरोना वॅक्सिन पोहोचवण्यात भारत कधीही मागे राहिला नाही. सध्या भारत अभूतपूर्व संकटात असताना देशातील अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अमेरिकेने वॅक्सिन उत्पादनासाठी कच्चा माल पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. युके, सौदी अरेबिया, सिंगापूर या देशांनी ऑक्सिजन कंटेनर्स दिले आहेत. भारतात ऑक्सिजनची उपलब्धता आहे, पण त्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कंटेनर्सची कमतरता जाणवत आहे.

हेही वाचा: मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती बिकट

कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये वाढत आहे. पण दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्ये या यादीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड्स अपुरे पडत चालले आहेत. दिल्लीतील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काहींना बेड मिळत नाहीत. हीच अवस्था उत्तर प्रदेशच्या लखनऊ, वाराणसी, कानपूरसहित अन्य शहरांची झाली आहे.