esakal | रेकॉर्डब्रेक वाढ! 24 तासांत 2.71 लाख नवे रुग्ण, मृतांची संख्याही वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

रेकॉर्डब्रेक वाढ! 24 तासांत 2.71 लाख नवे रुग्ण, मृतांची संख्याही वाढली

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Corona Update: नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून देशात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजवण्यास सुरवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी दोन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात भारतात तब्बल २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी (ता.१८) १ हजार ६१९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात झालेली सर्वाधिक मृत्यू नोंद ठरली आहे.

हेही वाचा: दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही १९ लाख २९ हजार ३२९ असून आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ७८ हजार ७६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ कोटी ७८ लाख ९४ हजार ५४९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात १३ लाख ५६ हजार १३३ जणांची चाचणी करण्यात आली.

हेही वाचा: कोरोनाचा कहर ! भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४५ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे दिवसभरातील मृत्यांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ६० हजार ४७३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच आतापर्यंत राज्यातील ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७० हजार ३८८ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: 'मोदी पंतप्रधान नव्हे पक्षपाती प्रचारक'

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढता राहिला आहे. रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे नोंदली जात आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असले तरी राज्यातील रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही, उलट ती अधिकच वाढत आहेत. त्यामुळे राज्यात कडकडीत लॉकडाऊन लागू केला जाईल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठा भार पडत असल्याने चिंता वाढली आहे.