भारत-रशियाची जवळीक वाढली 

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

नरेंद्र मोदींनी व्लादिमीर पुतीन यांची घेतली भेट 

सोची - भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील जवळीक वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नमूद केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या अनौपचारिक बैठकीत त्यांनी भारत आणि रशिया दरम्यानची धोरणात्मक भागीदारी आता विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर पोचली असल्याचे सांगितले. 

काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात बोलताना मोदी म्हणाले, की भारत आणि रशिया दीर्घकाळापासून मित्र आहे. त्यांनी पहिल्या अनौपचारिक बैठकीसाठी निमंत्रित केल्याबद्दल पुतीन यांचे आभार मानले. 

2001मधील तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबरच्या रशियाच्या आपल्या पहिल्या दौऱ्याची आठवण काढताना सांगितले, की गुजरातचा मुख्यमंत्री असताना चर्चा केलेले पुतीन पहिले जागतिक नेते होते. ते म्हणाले, की वाजपेयी आणि पुतीन यांनी धोरणात्मक भागीदारीचे लावलेले बीज आता दोन्ही देशांदरम्यान विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित झाले आहे. 

शांघाय सहकार्य संघटनेत कायम सदस्यत्व देण्यात भारताची मदत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोदींनी रशियाचे आभार मानले. आठ देशांच्या या संघटनेचा उद्देश सदस्य देशांमध्ये सैन्य तसेच आर्थिक सहकार्य वाढविणे असा आहे. भारत आणि पाकिस्तानला या संघटनेत गेल्या वर्षी सहभागी करून घेण्यात आले आहे. 

भारत आणि रशिया आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडोर आणि ब्रिक्‍सवर एकत्रितपणे काम करत आहेत. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाईल. दोन्ही देश एकमेकांना बहुराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आघाड्यांवर सहकार्य करत आहेत. 
- व्लादिमीर पुतीन, रशियाचे अध्यक्ष 

Web Title: india russia relation is much stronger