UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या प्रक्रियेत खोडा नको

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये दहशतवादाबद्दल मत व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्रे : दहशतवाद आणि दहशतवादी संघटना असल्याचे घोषित करण्यासाठीच्या विनंतीमध्ये गरज नसताना खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे, असं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. या साऱ्या प्रयत्नांमध्ये चीनकडून सातत्याने खोडा घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्या संदर्भाने भारताने स्पष्टपणे वरील मत व्यक्त केले. 

दहशतवादाविरोधातील लढाईत आपल्याकडून दुटप्पी धोरणांचा अवलंब केला जाऊ नये. दहशतवादी हे दहशतवादीच आहेत. यामध्ये चांगले आणि वाईट दहशतवादी याप्रकारचा फरक केला जाऊ शकत नाही. जे असा फरक करु पाहत आहेत त्यांचा विशिष्ट हेतू आहे. आणि या हेतूवर जे पांघरुन घालू पाहत आहेत, ते देखील दोषी आहेत, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाच सदस्य स्थायी आहेत तर 10 सदस्य अस्थायी आहेत. पाकिस्तानमध्ये राहणारा दहशतवादी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत जवळपास गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचा मित्र चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समिती अंतर्गत अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये वारंवार खोडा घातला होता. सरतेशेवटी मे 2019 मध्ये भारताला कूटनीतीमध्ये विजय मिळाला जेंव्हा संयुक्त राष्ट्राने अझरच्या विरोधात बंदी घातली.

दहशतवादावर प्रतिबंध आणण्यासंदर्भात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करायला हवी. यामध्ये पारदर्शकता, परिणामकारकता तसेच जबाबदारी देखील गरजेची आहे. या साऱ्या प्रक्रियेत विनाकारण खोडा घालण्याची प्रथा लवकरात लवकर बंद केली पाहिजे, असंही जयशंकर यांनी म्हटलं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india says China should stop the trend without stopping request of declaring terrorist