esakal | 'सीरम'चा भारताबाहेर लस उत्पादन सुरु करण्याचा विचार; जाणून घ्या कारण

बोलून बातमी शोधा

serum CEO adar poonawalla
'सीरम'चा भारताबाहेर लस उत्पादन सुरु करण्याचा विचार; जाणून घ्या कारण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारताची लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लसीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: 'रिलायन्स' बनली सर्वात मोठी ऑक्सिजन उत्पादक कंपनी; मुकेश अंबानी स्वतः घालताहेत लक्ष

पुढील काही दिवसात याबाबतची घोषणा करण्यात येईल, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. पुनावाला गेल्या आठवड्यात म्हणाले होते की, "सीरमकडे महिन्याची लस उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे. त्यानुसार, जुलैपर्यंत सीरमकडून १०० मिलियन डोस तयार केले जातील. यापूर्वी त्यांचं हे टार्गेट मे अखेरपर्यंतचं होतं. सध्या लसीच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक राज्यांतील लसीकरणात अडचणी येत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पुनावाला यांना आशा होती की, वार्षिक अडीज बिलियनवरुन ३ बिलियन डोसेस सहा महिन्यातंच पूर्ण करण्याची क्षमता सीरम वाढवेल. पण सीरम हे उद्दीष्ट गाठू शकलेली नाही. दरम्यान, पुनावाला काही दिवसांपूर्वीच लंडन दौऱ्यावर गेले होते.

संसर्ग वाढीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

जगात भारतात सर्वाधिक संसर्ग वाढणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशात सलग नऊ दिवसांमध्ये ३ लाखांहून नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी देशात ३,८६,४५२ रुग्णांची जागतीक नोंद झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला परदेशातून ऑक्सिजन, मेडिसिन आणि इतर गरजेची वैद्यकीय उपकरणं मागवावी लागत आहेत.