esakal | रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 
sakal

बोलून बातमी शोधा

india covid

रशियाने कोरोना व्हॅक्सिन तयार करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे उत्पादनही सुरु केले आहे. मात्र जगभरातून अनेक देशांनी या व्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली आहे. 

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - रशियाने कोरोना व्हॅक्सिन तयार करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे उत्पादनही सुरु केले आहे. मात्र जगभरातून अनेक देशांनी या व्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या देशांनी रशियाच्या या व्हॅक्सिनकडे संशयाच्या नजरेनं बघितलं आहे. असे असताना भारताने मात्र रशियावर विश्वास ठेवला आहे. भारताने रशियाचं व्हॅक्सिन घेण्यासाठी सकारात्मक पावले उचलली असून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत भारताच्या आरोग्य मंत्रालयानेसुद्धा माहिती दिली आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी सांगितलं की,'रशियाच्या स्पुटनिक 5 व्हॅक्सिनवर भारत आणि रशिया यांच्यात चर्चा सुरु आहे. काही प्राथमिक स्वरुपाची माहिती घेतली आहे.' रशियाने जगातील पहिल्या कोरोना व्हॅक्सिनची नोंदणी केली आहे. तसंच त्यांनी व्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली. तिसऱ्या टप्प्यातील ही चाचणी रशियात 54 केंद्रावर सुरु असून 40 हजारांहून अधिक लोकांवर केली जाणार आहे. 

व्हॅक्सिन लाँच झाल्यानंतर रशियाचे डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल दिमित्रोव्ह यांनी व्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी भारतासोबत भागिदारीची तयारी दर्शवली होती. त्यांनी म्हटलं होतं की, लॅटीन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्व देशांनी व्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी रशियाच्या व्हॅक्सिनबाबत सांगितलं की, रशियाने फास्ट ट्रॅक पद्धतीने व्हॅक्सिन तयार केलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या चाचणीत व्हॅक्सिन प्रभावी ठरल्याचंही भार्गव म्हणाले. 

हे वाचा - भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

दिमित्रोव्ह म्हणाले होते की, व्हॅक्सिनचे उत्पादन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या आम्हाला भारतासोबत भागिदारी करायची आहे. आम्हाला वाटतं की, भारत गामेलिया व्हॅक्सिनचं उत्पादन करण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे भारतासोबत भागिदारी झाल्यास आम्हाला मागणीनुसार व्हॅक्सिन तयार करता येईल. त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, रशिया आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तयार आहे.

भारतातील कोरोना व्हॅक्सिनचे संशोधनसुद्धा वेगाने सुरू आहे. आयसीएमआरच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात तीन व्हॅक्सिन यामध्ये पुढे आहेत.सीरम इन्स्टिट्यूटचं व्हॅक्सिन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. तर भारत बायोटेक आणि जीडस कॅडीलाचं व्हॅक्सिनने पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अस्ट्राजेनेकाने तयार केलेल्या व्हॅक्सिनला यावर्षी मंजुरी मिळू शकते.