भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 इतकी झाली आहे. मंगळवारी एका दिवसात 67 हजार 151 नवीन रुग्ण आढळले.

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. मंगळवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाखांच्या वर पोहोचली. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 59 हजारांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. आयसीएमआरच्या महासंचालकांनी मंगळवारी देसात कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण सांगितलं आहे. यासाठी त्यांनी काही बेजबाबदार लोक मास्क घालत नाहीत तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याचं म्हटलं आहे. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असल्याचं बलराम भार्गव यांनी सांगितलं. आयसीएमआरने दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे सुरू केला असून तो सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. 

भार्गव यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं की, तरुण किंवा वृद्ध असं वागत आहेत म्हणत नाही तर बेजबाबदार, जागरुक नसलेले नागरिक मास्क घालत नाहीत आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही. यामुळेच भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या राष्ट्रीय सीरो सर्व्हेच्या पूर्ण अहवालाची दोन वेळा समीक्षा करण्यात आली आहे. या आठवड्याच्या शेवटी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये  प्रकाशित होण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - ‘रिकव्हरी’ दर ७५ टक्‍क्‍यांवर; आरोग्य मंत्रालयाची माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं होतं की, स्पुटनिक V व्हॅक्सिनबाबत सांगायचं तर भारत रशियाच्या संपर्कात आहे. आरोग्य मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाण घेवाण झाली आहे. दरम्यान, अशीही माहिती समोर येत आहे की, रशियाने त्यांच्या व्हॅक्सिनची निर्मिती आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्यासाठी सहकार्य मागितलं आहे. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 इतकी झाली आहे. मंगळवारी एका दिवसात 67 हजार 151 नवीन रुग्ण आढळले. तर 1059 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 59 हजार 449 इतकी झाली आहे. देशात 7 लाख 7 हजार 267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. आतापर्यंत 24 लाख 67 हजार 759 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icmr say india covid 19 spread fast because Irresponsible peoples