वाद चिघळण्याची शक्यता; चीनने सीमाभागात तैनात केली J-20 फायटर विमाने

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

चीनने पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली- चीनने पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव वाढला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पेंगोग त्सो तलाव परिसरातील फिंगर फोर येथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळून लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने आपली जे-२० फायटर जेट पुन्हा एकदा लडाख जवळ तैनात केल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भारताने दक्षिण चिनी समुद्रात आपली युद्धनौका तैनात केली होती. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता.

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चीनच्या सैन्याने पेंगोग त्सो तलावाच्या परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उभय देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. असे असले तरी सैनिकांमध्ये शारीरिक झडप झाली नसल्याची माहिती भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. या घटनेमुळे सीमा भागात तणाव वाढला आहे. त्यामुळे श्रीनगर-लेह महामार्ग नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

पेंगोग त्सो तलाव सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे. कारण या तलावामधून दोन्ही देशांच्या सीमा जातात. पेंगोग त्सोच्या परिसरात बोटांसारखे दिसणारे ८ डोंगर आहेत. यांना फिंगर पॉंईट म्हटलं जातं. फिंगर पॉंईट १ ते ४ पर्यंत भारताचा पूर्ण ताबा आहे, तर ५ ते ८ फिंगर पॉंईट पर्यंत भारतीय सैन्य गस्त घालत घसते. चिनी सैन्याने ५ मे नंतर या भागात आपली हालचाल वाढवली आहे. त्यामुळे भारतीय जवानांच्या या भागात गस्त घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. चीनच्या पीएलएने या भागात बांधकाम कार्य हाती घेतलं आहे. फिंगर ४ पर्यंत चीनने एक रस्ता बांधला आहे. २९-३० च्या मध्यरात्री चीनच्या सैनिकांनी फिंगर ४ मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण हा त्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. आम्ही शांतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यावर विश्वास ठेवतो, पण कोणी आमच्या सार्वभौमत्वाला हात लावू पाहात असेल, तर आम्ही त्याला योग्य उत्तर देण्यास तयार आहोत, असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

1 रुपयाचा दंड भरा किंवा वकीली सोडा; प्रशांत भूषण यांना न्यायालयाने सुनावली...

१५ जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर उभय देशांमध्ये राजनयिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. असे असले तरी चीनने आपला आडमुठेपणा कायम ठेवला आहे. चीनने आपले सैन्य माघारी घेण्यास टाळाटाळ केली आहे. काही भागातून चिनी सैन्य मागे हटले असले तरी पेंगोग त्सो भागातून चीन मागे घटण्यास तयार नाही. त्यात ही झटापट झाल्याने स्थिती स्फोटक होण्याची चिन्हं आहेत.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India thwarts Chinese Army attempt to transgress near southern bank of Pangong lake