esakal | भारतावर आली ऑक्सिजन आयात करण्याची वेळ; केंद्राचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

India import Oxygen Cylinder

भारतावर आली ऑक्सिजन आयात करण्याची वेळ; केंद्राचा मोठा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Update: नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याप्रमाणात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेत केंद्र सरकारने ऑक्सिजन सिलिंडरची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा जास्त फटका बसलेल्या जगभरातील अनेक देशांनी ऑक्सिजनची आयात करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळेही ऑक्सिजनला मागणी वाढली आहे. देशात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, वैद्यकीय उपचारांसाठी वापराला जाणारा ऑक्सिजन नियोजनपूर्वक, योग्य पद्धतीने वापरा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिला होता. तसेच ऑक्सिजन नियमित आणि सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने केल्या होत्या.

हेही वाचा: बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेत मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने अनेक मंत्रालये, विभाग आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ईजी-१ या गटाची स्थापना केली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनसह देशात आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणाची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि त्याचा पुरवठा करणे हे या गटाचं प्रमुख काम आहे. देशातील विविध राज्यांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अशा राज्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोनाचा प्रकोप : वेळेआधीच कुंभमेळा आटोपणार ?

१२ राज्यात ऑक्सिजन सिलिंडर्सची अधिक मागणी

देशातील १२ राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे लसींसोबत ऑक्सिजनची मागणी राज्यांनी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या १२ राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी जास्त आहे. ईजी-१ हा समूह या राज्यांमधील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचे मॅपिंग करीत आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनची उत्पादनक्षमतेपेक्षा मागणी जास्त होऊ लागली आहे. मध्य प्रदेश राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तेथे एकही ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प नाही. तर कर्नाटक, राजस्थान आणि गुजरातमध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीमध्ये तेजी दिसून येत आहे.

हेही वाचा: दिलासादायक ! PM Cares Fund मधून 100 नव्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट

५० हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन करणार आयात

राज्यांतील वाढती मागणी लक्षात घेता ५० हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या निविदा काढण्यात येणार आहेत. सध्या देशात ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा आहे. यामध्ये औद्योगिक ऑक्सिजनच्या साठ्याचाही समावेश आहे.

दररोज ७१२७ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन

सध्या देशात दररोज ७१२७ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन करण्यात येत आहे. आवश्यकता पडल्यास स्टील उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आलेला ऑक्सिजनही वापरण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांच्या क्षमतेच्या १०० टक्के उत्पादन करत आहे, अशी माहिती ईजी-१च्या उच्चाधिकाऱ्याने दिली आहे.