तूर्त दिलासा, सबुरी आवश्‍यक - भारत सरकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 मे 2017

जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय दिलासा देणारा असला तरी तो केवळ तात्पुरता आहे आणि केवळ त्याआधारे पाठ थोपटून घेण्याची आवश्‍यकता नसल्याचा सबुरीचा सल्ला काही तज्ञ मंडळी देत आहेत

नवी दिल्ली - नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याबाबत भारत सरकारने आज आनंद व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी हा दिलासा देणारा निर्णय असल्याचे सांगून त्याचे स्वागत केले. परंतु, जाधव यांच्या "कॉन्सुलर ऍक्‍सेस'बाबत (वकील देणे) बोलताना बागले यांच्या उत्तरात स्पष्टता नव्हती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर बागले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या निकालामुळे सरकार आणि जाधव कुटुंबीयांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यापुढच्या काळात कोणती पावले उचलली जातील, याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

व्यावहारिकदृष्ट्या कॉन्सुलर ऍक्‍सेसबाबत भारताचे सोळा विनंतीअर्ज पाकिस्तानकडे पडून आहेत. त्यामुळे पाकिस्तानला इच्छा असेल तर त्यावर निर्णय करू शकतात. पाकिस्तानने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता दाखविलेली नाही आणि या प्रकरणात पाकिस्तानी लष्कर गुंतलेले असल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत भारताला किती आशा आणि खात्री आहे, याबाबत बागले यांना विचारण्यात आले. बागले यांनी, याबाबत अंदाज बांधण्याची भूमिका घेता येणार नाही, कारण हा निर्णय बंधनकारक असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे, तूर्तास त्यानुसारच भारताला अपेक्षा राखावी लागणार आहे.

जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय दिलासा देणारा असला तरी तो केवळ तात्पुरता आहे आणि केवळ त्याआधारे पाठ थोपटून घेण्याची आवश्‍यकता नसल्याचा सबुरीचा सल्ला काही तज्ञ मंडळी देत आहेत. याचे कारण जाधव हे पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहेत आणि आजच्या निर्णयाचे पालन करावयाचे की नाही याचा निर्णय ते करणार आहेत. यापूर्वी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय न मानता एका पकडलेल्या हेरास मृत्युदंड दिलेला होता ते उदाहरण सांगितले जात आहे. त्यामुळेच जाधव यांच्या भवितव्याबाबतची अनिश्‍चितता अद्याप कायम आहे.

दाद मागण्याची मुदत आज संपणार
जाधव यांना त्यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाद मागण्यासाठी पाकिस्तानने चाळीस दिवसांची मुदत दिली होती. ती उद्या संपत आहे. त्यासंदर्भात पुढे काय अशी विचारणा केली असता त्यावरही बागले यांनी फारसे स्पष्ट उत्तर दिले नाही. याबाबत भारत सरकारला काहीच माहिती नाही किंवा पाकिस्तान सरकारकडूनही भारताला कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असे सांगून त्यांनी जाधव यांच्या आईंनी त्यांच्या सुटकेसाठी केलेला अर्ज पाकिस्तान सरकारच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे एवढेच उत्तर दिले.

Web Title: India welcomes ICJ's verdict on Jadhav