भारताकडून सीमेवर टी-९० व टी ७० रणगाडे तैनात; १४ हजार फुटांवर लष्कर सज्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

गेल्या पाच महिन्यांपासून चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी थंडीच्या काळातही सज्जतेसाठी पावले टाकण्यास भारताने सुरवात केली आहे.

नवी दिल्ली- गेल्या पाच महिन्यांपासून चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी थंडीच्या काळातही सज्जतेसाठी पावले टाकण्यास भारताने सुरवात केली आहे. लष्कराने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (एलएसी) आर्मर्ड रेजिमेंटकडील टी-९० आणि टी -७२ रणगाडे तैनात केले आहेत. चुमार - डेमचोक भागात तब्बल १४ हजार ५०० फूट उंचीवर हे रणगाडे सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पूर्व लडाखच्या भागात भारत आणि चीन यांच्यात मे महिन्यापासून तणावाची स्थिती आहे. चीनने सीमाभागात तब्बल ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. त्याचबरोबर तोफा आणि रणगाड्याच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत. भारतीय सैन्य गेल्या पाच महिन्यांपासून या भागात १४,५०० फूटांहून अधिक उंचीवर चीनच्या सैन्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, हिवाळ्यात येथील नैसर्गिक परिस्थिती अत्यंत बिकट असते. या पार्श्वभूमीवर उणे ४० अंश सेल्सिअस तापमानातही चीनला उत्तर देण्यासाठी भारताने नवी रणनिती आखली आहे. याअंतर्गत भारताने सीमेजवळ टी-९० आणि टी-७२ रणगाडे तैनात केले आहेत. याशिवाय बीएमपी-२ कॉम्बॅट व्हेईकलही तेथे पाठविण्यात आली आहेत. हे रणगाडे उणे ४० अंश सेल्सिअस तापमानातही चालवता येतात. हिवाळ्यात पूर्व लडाखच्या भागात भीषण थंडी असते. अनेक ठिकाणी तापमान शून्याखाली जाते. काहीभागात ते उणे ३५ अंशांपर्यंत जाते. तसेच वेगवान थंडवारे वाहत असतात.

पाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद

भारतीय सैन्याच्या सज्जतेबाबत मेजर जनरल अरविंद कपूर म्हणाले, “या भूभागावरती रणगाडे, लढाऊ वाहने आणि मोठ्या तोफांची देखभाल करणे मोठे आव्हान असते. जिथे सिंधू नदी पूर्व लडाखच्या भागातून वाहते तिथे नद्या पार करणे आणि इतर अडथळ्यांना पार करुन त्या क्षेत्रात पूर्ण सज्जता ठेवण्याइतकी भारतीय रणगाडा रेजिमेंटची क्षमता आहे.”

“चीबरोबरील सीमेवरील युद्धसज्जतेची जबाबदारी ‘फायर अँड फ्युरी कोअर’वर आहे. जगभरातील सर्वांत कठीण भागांपैकी एका भागात यांत्रिक दलांना तैनात करण्यात आले आहे. या भागात रणगाडे, पायदळाच्या लढाऊ वाहने आणि तोफांची देखभाल करणे मोठं आव्हान असते. चालक दल आणि उपकरणांची सज्जता कायम राखण्यासाठी जवान आणि यंत्रांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. जवानांसाठी पौष्टीक खाणे, थंडीसाठी विशेष कपडे, तंबू, उष्णता निर्माण करण्यासाठी उपकरणे, गाड्यांसाठी इंधनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या सर्व गोष्टींच्या उपलब्धतेसाठी लष्कराचे अभियंते काम करत आहेत,” असेही मेज. जन. कपूर यांनी सांगितले.

मार्चनंतर पहिल्यांदा सोनं झालं स्वस्त; रुपया घसरला

“भारतीय सैन्याच्या पायदळाला कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही भागात काम करण्याचा अनुभव आहे. दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या साठ्यांच्या उच्च सुविधांमुळे मोठ्या कालावधीपर्यंत लढाई करण्याची या दलाची क्षमता आहे. इथे तैनात असलेल्या रेजिमेंट काही मिनिटांतच एलएसीपर्यंत पोहोचू शकतात,,” अशी माहितीही मेजर जनरल कपूर यांनी दिली.

या गोष्टींची सीमेवर सज्जता
- रणगाडे
- चिलखती वाहने, त्यांच्यासाठीचे इंधन
- उणे तापमानात राहण्यासाठी विशेष तंबू
- सैनिकांसाठी उबदार कपडे, पौष्टिक खाद्यपदार्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army deploys T90 T72 tanks along with Infantry Combat Vehicles on border