नदीतून शस्त्रास्त्रांची तस्करी; भारताने उधळला पाकचा डाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते.

श्रीनगर - उत्तर काश्मीरमध्ये शनिवारी भारताच्या लष्कराने राज्य पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती मिळताच लष्कराने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त मोहिम राबवली आणि दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त केली. 

जीओसी चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी माहिती देताना सांगितलं की, सर्व्हिलन्स डिव्हाइसचा वापर करत लष्कराने पाकिस्तानकडून तस्करी कऱण्यात येत असलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पाकिस्तानकडून अजुनही कुरापती सुरुच असल्याचं दिसतं. पुढच्या काही दिवसात त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सज्ज राहू असंही बीएस राजू यांनी सांगितलं. 

पाकिस्तानच्या बाजूने जवळपास 250 ते 300 दहशतवाद्यांचे लाँच पॅड असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी दिली.

दहशतवाद्यांकडून सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न केला जात असला तरी त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं लेफ्टनंट राजू यांनी सांगितले. 

हे वाचा - जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, राहुल गांधींचा निशाणा

शनिवारी जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा कट उधळला. सीमेपलीकडून देशात शस्त्रे आणण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र पाकच्या मनसुब्यांना उधळून लावत लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला. पाकिस्तानने यासाठी किशन गंगा नदीचा मार्ग निवडला होता. याचा एक व्हिडिओसुद्धा लष्कराने शेअर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian army recovered arms smuugled from pok terrorist in jk