भारतीय खाद्यसंस्कृतीचा आजपासून महोत्सव

पीटीआय
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

 

जगभरातील बल्लवाचार्य जाणून घेणार सात्त्विक आहारशास्त्र

 

जगभरातील बल्लवाचार्य जाणून घेणार सात्त्विक आहारशास्त्र

नवी दिल्ली : वैविध्यपूर्ण भारताच्या खाद्यसंस्कृतीत विविधता आहे. दक्षिण- उत्तर, पूर्व- पश्‍चिम भारतातील पदार्थांना वेगळी ओळख आहे. देशातील प्रत्येक प्रांताचा एक खास पदार्थ आहे. ही खाद्यपरपंरा व भारतातील सात्त्विक आहारशास्त्र जाणून घेण्यासाठी जगभरातील बल्लवाचार्य दिल्लीतील खाद्यपदार्थ महोत्सव परिषदेत सहभागी होणार आहेत.
"टेस्टिंग इंडिया सिम्पोसिअम' ही तीन दिवसांची खाद्य महोत्सव परिषद मंगळवारपासून (ता. 28) सुरू होणार आहे. भारतातील संपन्न खाद्यसंस्कृतीमधील लुप्त झालेल्या परंपरागत खाद्यपदार्थांचा शोध या परिषदेत घेतला जाणार आहे. "इट इन इंडिया मेक इन इंडिया' आणि वसुंधरेचे अस्तित्व चिरकाल टिकण्यासाठी "जंकफूडमुक्त खाद्य' या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात निरोगी मन व मेंदूसाठी सात्त्विक आहारावर भर देण्यात येणार असून, पाककलेचे योग्य स्थान म्हणून भारताचा प्रचार करण्यात येणार आहे. "अतुल्य भारत', "सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई)', स्टॉकहोममधील "ईएटी फाउंडेशन', "इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर', "नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' आणि "द इंडियन फेडरेशन ऑफ कलिनरी असोसिएशन' यांच्यासह महाराष्ट्र व सिक्कीम पर्यटन विभागातर्फे या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
भारतातील सात्त्विक आहाराची विपुलता व सेंद्रिय शेती करण्याचा वाढता कल यामुळे खाद्य-पर्यटनस्थळ निर्माण होण्याची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी या परिषदेत मिळणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. भारतीय खाद्य इतिहास आणि परंपरा याविषयी, तसेच सेंद्रिय शेतीबद्दल ज्यांनी लिहिले आहे, अशा लोकांना एकमेकांशी संवाद साधता येणार आहे. हा महोत्सव 2 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

परिषदेतील कार्यक्रम
देशातील प्रादेशिक खाद्यपदार्थांवर यात परिसंवाद होणार असून लडाख, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाना, राजस्थानमधील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा कथन करणारा "चौपाल' हा कार्यक्रमाचे आकर्षण असेल. अमेरिका, स्वीडन, नॉर्वे, तुर्कस्तान व संयुक्त अरब अमिरातीमधील प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. भारतीय खाद्यपदार्थ निर्मितीत बदल घडवून आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीशी चर्चा करण्यासाठी हे प्रतिनिधी देशातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत.

Web Title: indian food festival