
Indian Navy Day 2022: भारतीय नेव्हीच्या हल्ल्यात 7 दिवस जळत होता कराची पोर्ट, वाचा नेव्ही डेचा इतिहास
Indian Navy Day: 1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. 3 डिसेंबर च्या दिवशी भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशमध्ये पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध युद्ध पुकारलं होतं.
त्याचवेळी म्हणजेच 4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' च्या माध्यमातून भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावरही हल्ला केला होता. या युद्धात पहिल्यांदाच जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागलं होतं. या हल्ल्यात पाकिस्तानची तीन जहाजं उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात भारतीय नौदलाच्या आयएनएस खुकरीलाही जलसमाधी मिळाली होती. या जहाजावर 18 अधिकाऱ्यांसह सुमारे 176 नौदल कर्मचारी होते.
'ऑपरेशन ट्रायडंट'
नौदल प्रमुख अॅडमिरल एस. एम नंदा यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ट्रायडंटचा प्लॅन तयार करण्यात आला. या टास्कची जबाबदारी 25 व्या स्क्वाड्रन कमांडर बबरु भान यादव यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
4 डिसेंबर 1971 च्या दिवशी भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची येथील नौदलाच्या मुख्यालयावर पहिला हल्ला केला. यात इम्युनेशन सप्लायसहित बरीच जहाजं उडवून देण्यात आली. या हल्ल्यात पाकिस्तानच्या तेलाचे टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले.
नेमका प्लॅन काय होता?
त्या दिवशी भारतीय नौदलाला कमांड देण्यात आली होती की, त्यांनी कराचीपासून 250 किमी अंतरावर थांबावं. त्यानंतर संध्याकाळ व्हायला आल्यावर 150 किमी पुढे सरकावं. त्यानंतर जसा का, हल्ला चढवला लगोलग म्हणजे पहाट होण्यापूर्वी 150 किमी माघारी फिरावं.
हा हल्ला रशियाच्या ओसा मिसाईल बोटीद्वारे करण्यात आला. ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत पहिला हल्ला निपत, निर्घट आणि वीर या
क्षेपणास्त्र सज्ज बोटींद्वारे करण्यात आला. या बोटी चारचार मिसाईल्सने सुसज्ज होत्या. बबरु भान यादव स्वतः टॅकल बोटीवर उपस्थित होते.
पहिल्यांदा पीएनएस खैबर उडवली, नंतर पीएनएस चॅलेंजर आणि नंतर पीएनएस मुहाफिझ उडवून पाण्यात बुडवण्यात आली. या हल्ल्यानंतर पाक नौदल सतर्क झालं. त्यांनी कराची बंदराभोवती छोट्या विमानांच्या माध्यमातून रात्रंदिवस गस्त घालायला सुरुवात केली.
हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
आणि कराची तेल डेपो सात दिवस जळत होता..
भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्यात कराची ऑइल डेपोला आग लागली. या डेपोला लागलेली आग 60 किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. ऑपरेशन संपताच भारतीय नौदल अधिकारी विजय जेरथ यांनी मॅसेज पाठवला, 'फॉर पिजन हॅप्पी इन द नेस्ट. रिजॉईनिंग.' यावर त्यांना उत्तर मिळालं होतं, 'F15 च्या विनाशासाठी : आजपर्यंत यापेक्षा चांगली दिवाळी आपण पाहिली नाही.'
कराची ऑईल डेपो सलग सात दिवस आणि सात रात्री जळतच होता.