'फनी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; एनडीआरएफ, तटरक्षक दल 'हाय अलर्ट'वर 

fani
fani

नवी दिल्ली : फनी चक्रीवादळ गुरुवारपर्यंत अतिगंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि तटरक्षक दलाला अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

भारतीय हवामान विभागातील चक्रीवादळ इशारा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी स्पष्ट केले की, फनी चक्रीवादळ सध्या श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या पूर्वेला 620 किलोमीटर अंतरावर आणि चेन्नईच्या आग्नेय दिशेला 880 किलोमीटर अंतरावर घोंघावत आहे. सोमवारी संध्याकाळी चक्रीवादळाची तीव्रता वाढेल. त्या पुढील 24 तासांमध्ये ते गंभीर स्वरूप धारण करू शकते. गुरुवारी ते अतिधोकादायक पातळीवर पोचण्याची शक्‍यता आहे. एक मेपर्यंत हे चक्रीवादळ वायव्येकडे सरकणार आहे. 
पुढील दोन दिवसांमध्ये तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्तीनिवारण समितीनेही (एनसीएमसी) आज परिस्थितीचा आढावा घेत संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांना माहिती दिली. 

मोदींनी घेतला आढावा 
फनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्‌विटरवर दिली. मोदी यांनी म्हटले आहे, की फनी चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर आज अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आवश्‍यक त्या उपाययोजना आणि मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांमधील सरकारशी समन्वय साधून काम करण्यास सांगितले आहे. 

मच्छीमारांना इशारा 
पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागात 3 मेपर्यंत समुद्र खवळलेला असेल, अशी माहिती ओडिशातील हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला 100 ते 115 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. या भागात खोल समुद्रात न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आला आहे. मछलीपट्टणम, कृष्णपट्टणम, विशाखापट्टणम, गंगावरम आणि काकीनाडा बंदरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धोक्‍याचा इशारा जारी करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com