गर्भवती महिलेच्या मदतीसाठी 'देवदूत' होऊन धावला फौजी; पहा व्हिडिओ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

कुपवाडामध्ये भारतीय जवानांनी गुडघाभर बर्फातून मार्ग काढत गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात मदत केल्याचे पाहायला मिळाले.

कुपवाडा: काश्मीरमध्ये बर्फवृष्टीने लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. याठिकाणच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत भारतीय जवान सामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. कुपवाडामध्ये भारतीय जवानांनी गुडघाभर बर्फातून मार्ग काढत गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात मदत केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर स्थानिकांसह सोशल मीडियावर जवानांच्या कामाला सलाम करण्यात येत आहे. 

दोन दिवसांपूर्वी कुपवाडा येथील दुर्मिळ भागात वसलेल्या गावातील गर्भवती महिलेला जवानांनी आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयापर्यंत पोहचवले. गुडघ्यापर्यंत बर्फ असलेल्या परिसरातून जवानांनी 2 किमीचा प्रवास पार केल्यानंतर महिलेला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले. संबंधित महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.   

DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी

कुपवाडा परिसरात जवानांनी गर्भवती महिलेला मदत केल्याचा एक व्हिडिओ उद्यमपूर डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. भारतीय जवान नागरिकांसाठी आहेत, त्यांना सुरक्षा देण हेच त्यांचे ध्येय आहे, अशा आशयाच्या हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून भारतीय जवानांच्या कार्याचे कौतुक होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian soldier helping pregnant woman in kupwara kashmir Watch Viral Video