पिंजऱयात बंदिस्त होऊन नदीत झोकून देणारा जादूगार बेपत्ता

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

पिंजऱयात 36 कुलूपांनी बंदिस्त होऊन स्वतःला गंगा नदीत झोकून देणारा जादूगार बेपत्ता झाला आहे.

कोलकाता : पिंजऱयात 36 कुलूपांनी बंदिस्त होऊन स्वतःला गंगा नदीत झोकून देणारा जादूगार बेपत्ता झाला आहे. जादूगाराचे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, ते परत कधी येतील याकडे डोळे लावून बसले आहेत.

चंचल लाहिरी (वय 40) असे या जादूगाराचे नाव असून, ते जादूगार मँड्रेक या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वतःचे हातपाय बांधून 36 कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यात कोंडून घेत गंगा नदीत झोकून दिले. कुटुंबीय, पोलिस आणि प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हा स्टंट त्यांनी केला. स्टीलच्या पिंजऱ्यात 30 फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा स्टंट केला. ते सहा सेकंदांनी पाण्यावर आलेही. त्याचवेळी चाहत्यांनी जादूगार मँड्रेक यांनी ही जादू कशी केली, हे आपण सांगू शकतो, असा दावा केला होता. दरम्यान, चंचल लाहिरी हे बेपत्ता झाले असून, प्रशासनाकडून गंगा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.

'मी स्वतःला मोकळं करु शकलो, तर ती जादू असेल, अन्यथा ती शोकांतिका ठरेल' अशी प्रतिक्रिया त्यांनी हा स्टंट करण्यापूर्वी दिली होती. याच ठिकाणी 21 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अशाच प्रकारचा स्टंट आपण केल्याचंही त्यांनी सांगितले होते. 'मी एका बुलेटप्रूफ काचेच्या बॉक्समध्ये होतो. साखळ्यांनी स्वतःला कुलूपबंद करुन घेतले होते. हावडा ब्रिजवरुन मला खाली सोडण्यात आले. मी 29 सेकंदांच्या आत बाहेर आलो होतो' अशी माहिती जादूगार मँड्रेक यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. यावेळी स्वतःला सोडवणे अधिक कठीण असेल, असेही ते म्हणाले होते. 2013 मध्येही लाहिरी यांनी हा स्टंट केला होता, मात्र, बघ्यांनी हुल्लडबाजी केली होती. बॉक्सच्या दरवाजातून त्यांना बाहेर पडताना पाहिल्यानंतर बघ्यांनी त्यांना त्रास दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian stuntman Chanchal Lahiri aka Wizard Mandrake goes missing after being lowered into the Ganges tied up with steel chains