कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात; केंद्रिय मंत्र्यांचे विधान

वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

  • केंद्रीय नेते गिरिराजसिंह यांचे वादग्रस्त विधान

बेगुसराय (बिहार) : "कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकून परदेशात जाणारे बहुतांश भारतीय गोमांस खाण्यास सुरुवात करतात,'' असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाद निर्माण होतील अशी विधाने करीत सतत चर्चेच राहणारे गिरिराजसिंह यांनी भागवत कथा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना गोमांस खाण्याचा संबंध कॉन्व्हेंट शाळांशी जोडला. ते म्हणाले, ""खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गीतेचे श्‍लोक शिकवायला हवेत आणि शाळांमध्ये मंदिर उभारावे. आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत पाठवतो. तेथे शिकून मुले आयआयटीत जातात. अभियंते, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक बनतात. पण, पुढे हीच मुले जेव्हा परदेशात जातात तेव्हा अनेक जण गोमांस खातात. कारण, आपण त्यांना आपले संस्कार, परंपरा, मूल्य, त्यांच्यावर योग्य संस्कार, श्रावण बाळाचे संस्कार शिकवत नाही. म्हणूनच, मुलांना लहानपणापासूनच शाळांमध्ये गीतेचे श्‍लोक आणि हनुमानस्तोत्र शिकवणे आवश्‍यक आहे.''

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

"भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची गरज'
गिरिराजसिंह म्हणाले की, मी अनेक घरांची पाहणी केली. पण, त्यातील फक्त 15 घरांमध्ये हनुमानस्तोत्र, तर तीन घरांमध्ये रामायण आणि भगवद्‌गीता आढळली. यामुळेच, आपल्या मुलांना परंपरेची ओळख होत नाही. पण, आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आपल्या येथे प्रखरतावादाला स्थान नाही. भारताचा बचाव करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याची गरज आहे.

"सरकारी शाळांमध्ये जर गीतेचे श्‍लोक आणि हनुमानस्तोत्र शिकवण्याचा मुद्दा उपस्थित केला तर लोक म्हणतील, की भगवेकरण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे याची सुरुवात खासगी शाळांपासून व्हावी.'' - गिरिराजसिंह, केंद्रीय मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians abroad start eating beef as they are not being taught cultural traditional values says Giriraj Singh