भारताकडून पाकला तोडीस तोड प्रत्युत्तर

यूएनआय
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

जम्मू - शस्त्रसंधीचा भंग करत आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सना लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मागील सात दिवसांत 15 रेंजर्सना ठार मारण्यात आल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज सांगितले. "बीएसएफ'चे अतिरिक्त महासंचालक अरुणकुमार यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

जम्मू - शस्त्रसंधीचा भंग करत आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सना लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मागील सात दिवसांत 15 रेंजर्सना ठार मारण्यात आल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज सांगितले. "बीएसएफ'चे अतिरिक्त महासंचालक अरुणकुमार यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

पाकच्या गोळीबारात काल (ता. 27) हुतात्मा झालेला बीएसएफचा जवान जितेंद्र कुमार याला आदरांजली वाहिल्यानंतर अरुणकुमार म्हणाले, ""पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान गुरनामसिंग हुतात्मा झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात 15 पाकिस्तानी रेंजर्सना मारण्यात यश आले आहे. शत्रूला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात असून, आतापर्यंत घुसखोरीचे दोन प्रयत्नही उधळून लावण्यात आले आहेत.'' पाकिस्तानी लष्कराची बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) नियंत्रण रेषेवर कार्यरत झाली असली, तरी आपले जवानही अत्यंत सावध आहेत. कोणत्याही प्रकारचा हल्ला उधळून लावण्यास ते समर्थ आहेत, असेही अरुणकुमार यांनी सांगितले.
पाकिस्तानने दोन दिवसांपासून जम्मू भागात उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला आहे. त्यांच्या हल्ल्यात दोन नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे निमलष्करी दल असलेल्या रेंजर्सनी जम्मू, कथुआ, पूँच आणि राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील लष्करी ठाणी आणि नागरिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि दारूगोळा पाहता त्यांना पाकिस्तानच्या लष्कराचे पाठबळ असल्याचे दिसून येत असल्याचे "बीएसएफ'चे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात एका महिलेसह दोन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, तर दोन जण जखमी झाले आहेत.

शस्त्रसंधीचा भंग सुरूच
पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरील शस्त्रसंधीचा भंग सुरूच असून आजही त्यांनी केलेल्या गोळीबारात एक मुलगी जखमी झाली आहे. जम्मू, कथुआ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये हा गोळीबार सुरू आहे. उखळी तोफा आणि रायफल्सचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून होत आहे. भारतीय जवानांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक लष्करी ठाण्यांचे मोठे नुकसान झाल्याचे "बीएसएफ'ने सांगितले आहे.

Web Title: Indias answer to Pakistan