ऑस्करच्या शर्यतीत भारताचा ‘बिट्टू’; ‘लाइव्ह ॲक्शन लघुपटा’च्या श्रेणीत नामांकन

वृत्तसंस्था
Thursday, 11 February 2021

प्रचंड लोकप्रियता मिळवूनही मल्याळी चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत नामांकन मिळू शकले नाही आणि तो मानाच्या ९३ व्या ॲकॅडमी पुरस्कारांच्या स्पर्धेतून बाहेर पडला.

नवी दिल्ली - निर्माती एकता कपूरच्या ‘बिट्टू’ हा लघुपट २०२१ मधील ऑस्करच्या शर्यतीत आहे. ‘लाइव्ह ॲक्शन लघुपटा’च्या श्रेणीत हा लघुपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.  सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांमध्ये याचे नामांकन झाले आहे. 

प्रचंड लोकप्रियता मिळवूनही मल्याळी चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत नामांकन मिळू शकले नाही आणि तो मानाच्या ९३ व्या ॲकॅडमी पुरस्कारांच्या स्पर्धेतून बाहेर पडला. ‘बिट्टू’ची निर्मिती एकता कपूर, ताहिरा कश्‍यप आणि गुनीत मोंगा या त्रिकुटाने केली आहे. त्यांनीच ही माहिती सोशल मीडियातून दिली. ‘इंडियन वूमेन रायझिंग’ अंतर्गत हा आमचा पहिला प्रकल्प आहे. तो खूप खास आहे. करिष्मा देव-दुबे तुम्ही अशीच प्रगती करा, असे अभिनंदनपर ट्विट करीत ताहिरा यांनी आनंद व्यक्त केला. एकता कपूरनेही सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे या लघुपटाचे दिग्दर्शन करिष्मा देव-दुबे या विद्यार्थिनीने केले आहे. ऑस्करपर्यंत पोचण्यापूर्वी हा लघुपट १८ विविध चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. ‘बीएफआय लंडन चित्रपट महोत्सव, टेल्युराइड पाम स्प्रिंग्स शॉर्टफिल्म, होलीशॉर्टस् आदी ठिकाणी ‘बिट्टू’चे कौतुक झाले आहे. धर्मशाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा लघुपट दाखविण्यात आला असून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. करिष्माला ‘बिट्टू’साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा ४७ वा स्टुडंट ॲकॅडमी पुरस्कार मिळाला असून आता ऑस्करची मोहोरची त्याच्यावर उमटेल असा विश्‍वास व्यक्त होत आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, अभिनेते आयुष्मान खुराणा आणि अली फजल यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर ‘बिट्टू’चे भरभरून कौतुक केले आहे. 

कलाकारांचा वास्तव अभिनय
‘बिट्टू’ कथा वास्तवाशी निगडित आहे. एकमेकींवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन जिवलग मैत्रिणी यात आहेत. एक दिवस असा येतो की शाळेत दोघींवर विषप्रयोग केला जातो. या घटनेनंतर ही कथा नाट्यमय वळण घेते. या लघुपटातील कलाकार नवखे असले तरी त्यांनी जीव ओतून केलेले काम ही ‘बिट्टू’ची ताकद आहे. राणी कुमारी, रुनू कुमारी, कृष्णा नेगी, मोनू उनियाल आणि सलमा खातूम या कलाकारांच्या अभिनयाने या लघुपटाची चर्चा जगभरात होत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे आहेत दहा लघुपट
ऑस्करच्या  ‘लाइव्ह ॲक्शन लघुपटा’च्या श्रेणीसाठी १७४ लघुपट दाखल झाले होते. लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट विभागातील सदस्यांनी त्यातून भारताच्या ‘बिट्टू’सह ‘दा यी’, ‘फिलिंग थ्रू’, ‘द ह्यूमन व्हॉइस’, ‘द किक्सलिड क्वॉयर, ‘द लेटर रूम’, ‘द प्रेझेंट, ‘टू डिस्टंस स्ट्रेंजर’, ‘द व्हॅन’ आणि ‘व्हाइट आय’ या दहा लघुपटांची निवड केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's Bittu in Oscar race Bittu makes it to Best Live Action Short Film shortlist