कॉंग्रेसमध्ये अखेर 'सत्तांतरा'ची चिन्हे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - कॉंग्रेस कार्यकारिणीच्या आज येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लवकरात लवकर पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. राहुल गांधी यांनीही कार्यकारिणीच्या मागणीचा ते आदर करीत असल्याचे सांगून आपली अनुकूलता दर्शविली. या घटनेनंतर आता त्यांचा पक्षाध्यक्षपदाचा मार्ग प्रशस्त झाला असला, तरी अंतिम निर्णय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सोपविण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कॉंग्रेस कार्यकारिणीच्या आज येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लवकरात लवकर पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. राहुल गांधी यांनीही कार्यकारिणीच्या मागणीचा ते आदर करीत असल्याचे सांगून आपली अनुकूलता दर्शविली. या घटनेनंतर आता त्यांचा पक्षाध्यक्षपदाचा मार्ग प्रशस्त झाला असला, तरी अंतिम निर्णय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सोपविण्यात आला आहे. 

कॉंग्रेस कार्यकारिणीची आजची बैठक मूलतः पक्षसंघटनेच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाचा विचार करण्यासाठी होती. पक्षांतर्गत निवडणुकांसाठी पक्षाने निवडणूक आयोगाकडून एक वर्षाची मुदतवाढ घेतलेली होती आणि त्याची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याने त्यात आणखी वाढ घेण्याचा मुद्दा विषयपत्रिकेवर होता. परंतु सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या बैठकीला सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांना बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगण्यात आले आणि तेव्हाच बैठकीची दिशा निश्‍चित झाली. 

बैठकीची सुरवात राहुल गांधी यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय घेण्यास त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडे आणखी एक वर्षाची मुदतवाढ मागण्याचा ठराव झाल्यानंतर देशातील सद्यःस्थितीवर चर्चा होऊन त्याबाबतचा एक ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचा विषय आणला. "पक्षाची सूत्रे त्यांनी हाती घेण्याची वेळ आता आली आहे,' असे अँटनी यांनी सांगितले. त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्काळ अनुमोदन देऊन पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. यानंतर एकामागून एक कॉंग्रेस नेत्यांनी त्यास पाठिंबा देण्यास सुरवात केली. गुलाम नबी आझाद, गुरुदास कामत, मल्लिकार्जुन खर्गे, मोतीलाल व्होरा, आनंद शर्मा अशा सर्व उपस्थित नेत्यांनी त्यावर एकमुखाने पाठिंबा दिला. यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकारिणीने व्यक्त केलेल्या विश्‍वासाबद्दल आभार मानले आणि नेत्यांच्या भावनेचा आदर करीत असल्याचेही सांगितले. यानंतर काही प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन कार्यकारिणीतील या घडामोडीचा वृत्तान्त त्यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात आले. 

सोनिया गांधी या गेली जवळपास दोन महिने प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नाहीत. वारणसी येथे त्यांनी केलेल्या "रोड शो'च्या वेळी त्यांच्या खांद्याला व हाताला दुखापत झाली होती, तसेच अन्य त्रासही झाला होता. तो कार्यक्रम अर्धवट सोडून त्यांना दिल्लीस परतावे लागले होते. त्यानंतर पक्षाचा कारभार जवळपास राहुल गांधीच सांभाळत होते. याच काळात त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधातही मोहीम उघडली. विशेषतः माजी सैनिकांच्या पेन्शनच्या विषयावरून त्यांनी मोर्चे निदर्शने केली, त्यात त्यांना तीन वेळेस पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. केंद्र सरकारच्या आर्थिक, तसेच सुरक्षाविषयक धोरणांवर त्यांनी विशेष रोख ठेवलेला होता. गेल्या काही दिवसांत अनेक वेळेस त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॉंग्रेसवर प्रसिद्धीही विशेष प्रकाशझोत राहिला. उत्तर प्रदेशातील एक महिन्याच्या त्यांच्या किसान यात्रेनेही त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली. या पार्श्‍वभूमीवरच कॉंग्रेसमधील या संभाव्य "सत्तांतरा'कडे पाहिले जात आहे. 
 

तांत्रिक अडचण नाही 
कॉंग्रेसच्या पक्षसंघटनात्मक निवडणुकांना मुदतवाढ घेतल्याने राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदी होणाऱ्या संभाव्य बढतीच्या प्रक्रियेत बाधा येणार काय आणि सोनिया गांधीच आणखी वर्षभर अध्यक्ष राहणार काय, असे तांत्रिक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. परंतु कॉंग्रेस संघटना आणि पक्षघटना यांचा हवाला देऊन त्याचा आणि राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच कॉंग्रेस महासमितीची एक दिवसाची बैठक घेऊन त्यामध्ये राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. बहुधा येत्या 19 नोव्हेंबरला ही बैठक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Indications of Changing leadership in Congress