मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे संकेत

उत्तर प्रदेश व महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा
cabinet committee
cabinet committeesakal

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुका होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच मालिकेत आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन राज्यांबरोबरच भाजपला सलग दुसऱ्यांदा साथ देणारा व लोकसभेची ‘किल्ली’ मानला जाणारा उत्तर प्रदेश, मुंबई महापालिका निवडणूक व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची दिल्लीची महत्वाकांक्षा पाहता या संभाव्य विस्तारात मुंबई-महाराष्ट्रालाही महत्त्वाचे स्थान मिळण्याचे संकेत आहेत. ‘टीम मोदी’मधील काही मंत्र्यांना घरी बसावे लागण्याची चिन्हे आहेत.

राजकीय वर्तुळातील हालचाली पाहता गुजरात, हिमाचल प्रदेश बरोबरच काही मराठी नावेही ‘टीम मोदी’बरोबर जोडली जाण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई भागातील एक खासदार, भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे व राज्यातील एका अल्पसंख्याक नेत्याची वर्णी ‘टीम मोदी’मध्ये लागण्याची शक्यता आहे.

रहाटकर व तावडे यांच्याकडील पूर्वीच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्यावरही या दोघांनी शांतपणे काम सुरू ठेवले आहे. तावडे यांची तर दिल्लीत बदली केली तरी, त्यांनी हरियानाची जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने सांभाळली हा त्यांचा ‘प्लस पॉइंट ठरू शकतो. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात तावडे यांना जे कार्यालय देण्यात आले आहे ते पाहिले तरी राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची चुणुक मिळते. रहाटकर यांच्याकडील महिला मोर्चाची जबाबदारी काढून घेतल्यावरही पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समिती या क्र.२ च्या महत्त्वाच्या मंडळात त्यांचे स्थान अबाधित आहे.

मोदी यांनी मोठ्या प्रशासनिक फेरबदलांची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण केली. त्याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांच्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही पंतप्रधान कार्यालयाकडून सुरू आहे. मोदी शासनातील गेल्या आठ वर्षांतील निवडक मंत्रिमंडळ फेरबदलांकडे नजर टाकली तर, ज्या राज्यांत निवडणुका असतात तेथील कामसू खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात आवर्जून स्थान दिले जाते. त्याचबरोबर कामगिरीत कमी आढळलेल्या व आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ देण्यास केंद्रीय नेतृत्व बिलकूल मागेपुढे पाहत नाही.

राष्ट्रपतिपदासाठी आनंदीबेन?

गुजरातची निवडणूक तोंडावर आली आहे. यंदा तेथे भाजपला अनुकूल वारे वहात असले तरी, स्वतःच्याच राज्याबाबत भाजप नेतृत्व यत्किंचितही धोका पत्करणार नाही. त्यामुळेच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदी, म्हणजे राष्ट्रपतिपदी ‘यूपी’च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. देशाच्या दोन सर्वोच्च पदांवर गुजराती नेते असल्याचा व गुजराती अस्मितेवर फुंकर घालणारा प्रचार भाजपच्या आणखी पथ्यावर पडणार हे उघड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com