जीवनावश्‍यक वस्तूंची काश्‍मीरमध्ये भाववाढ

यूएनआय
बुधवार, 17 मे 2017

जम्मू-काश्‍मीरची राजधानी उन्हाळ्यात जम्मूहून श्रीनगरला हलविण्यात आल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र ती फोल ठरली असून तेथील परिस्थिती कठीण बनली आहे. जीवनावश्‍यक सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अशांतता आहे. हिंसाचार, आंदोलने, निषेध मोर्चा यामुळे राज्यातील परिस्थिती नाजूक बनली आहे. येथे कायदा व सुरक्षा राखण्यावरच प्रशासनाला सर्व लक्ष केंद्रित करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणजे काश्‍मीर खोऱ्यात जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रमजानच्या महिन्यात भाववाढ अधिक तीव्र होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. प्रामुख्याने चिकन व भाजीपाल्याचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी पथक स्थापन करण्याची आणि काळा बाजार व साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना श्रीनगरचे उपआयुक्त डॉ. फारुक अहमद लोण यांनी अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांना दिल्या आहेत. जम्मू-काश्‍मीरची राजधानी उन्हाळ्यात जम्मूहून श्रीनगरला हलविण्यात आल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र ती फोल ठरली असून तेथील परिस्थिती कठीण बनली आहे. जीवनावश्‍यक सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचबरोबर पाणीटंचाई, खराब रस्ते अशा समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.

दरम्यान, काश्‍मीरची बाजारपेठ प्रामुख्याने उत्तर भारतासह अन्य राज्यांतून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे. मात्र श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग जड वाहनांसाठी एकेरी खुला असतो. यामुळे चिकन, भाजीपाला व अन्य वस्तूंचा पुरवठा अपुरा होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे; तसेच गारपीट, पाऊस व अवेळी झालेला हिमवर्षावामुळे काश्‍मीर खोऱ्यातील पिकांना मोठा फटका बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

"सरकारी दराने खरेदी करा'
सरकारने निश्‍चित केलेल्या दरानुसारच नागरिकांनी मांस खरेदी करण्याचे आवाहन उपआयुक्त डॉ. लोण यांनी केले आहे. गेल्या महिन्यात 110 ते 125 रुपये किलोने चिकन मिळत होते. आज त्याची किंमत 160-170 रुपये किलो आहे. मात्र काही ठिकाणी मांसविक्री 400-420 रुपये किलोने होत आहे. "हाक' ही स्थानिक पालेभाजीचा भाव गेल्या वर्षी 20 ते 25 रुपये किलो होता. सध्या तो 40 ते 50 रुपये किलोपर्यंत पोचला आहे. मटार 70 रुपये किलो, टोमॅटो- 30, मुळा- 40, फ्लॉवर व कोबी- 40 ते 55, कांदा- 30, बटाटा- 20 ते 35 किलो असे भाज्यांचे भाव आहेत.

Web Title: Inflation in Kashmir