भारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय

भारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या "मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग असूनही भारत सहभागी होणार असल्याच्या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले होते. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने, आज "भारत या परिषदेत अनौपचारिकरीत्या सहभागी होणार आहे' असे स्पष्टीकरण देण्यात आले. दहशतवादी कारवायांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या तालिबानला भारताने त्याच्या जन्मापासूनच कडाडून विरोध केलेला आहे. 

अफगाणिस्तानात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी रशियाने पुढाकार घेऊन मॉस्कोमध्ये ही बैठक बोलावली असून तीत भारत, चीन, तालिबान, पाकिस्तान हे देश सहभागी होतील. या बैठकीच्या निमित्ताने प्रथमच भारत व तालिबानी प्रतिनिधी एकाच मंचावर येणार असल्याने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका, चीन व भारताची सैन्ये त्या देशांत आहेत. तरीही तालिबानी दहशतावादाच्या धुमाकुळामुळे गेली दोन वर्षे आसाममध्ये यादवी आहे. अफगाणिस्तानातील लोकशाहीबाबतचा निर्णय त्या देशानेच घ्यायचा आहे, ही भूमिका भारताने प्रथमपासून मांडलेली आहे. 

रवीशकुमार म्हणाले 

अफगाणिस्तानात शांती व युद्धविरामाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जे जे प्रयत्न होतील त्यात भारत सहभागी होईल, असे मात्र भारताने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी याबाबत सांगितले, की उद्याच्या मॉस्को परिषदेत भारताचा सहभाग हा अनौपचारिक स्वरूपाचा असेल.

अफगाणिस्तानातील संघर्षाची परिस्थिती निवळून त्या देशात सुरक्षा व शांतता पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांत भारत सहभागी आहे. या चर्चेत भारत तालिबानशी चर्चा करणार नाही असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानच्या वतीने जे शांतता प्रयत्न केले जातील व भारताच्या मते जे देशाच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहेत, त्या सर्वांत भारत सहभागी होईल असेही कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, जे काही निर्णय होतील त्यात भारत प्रत्यक्षपणे सहभागी होणार नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात आले. 

उमर अब्दुल्लांचे प्रश्‍नचिन्ह 

अफगाणिस्तानातील प्रस्तावित बैठकीतील भारताच्या सहभागावर "नॅशनल कॉन्फरन्स'चे नेते उमर अब्दुल्ला यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. तालिबानबरोबरच्या चर्चेत भारत सहभागी होऊ शकतो, तर जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तेथील सर्व घटकांबरोबर अशीच अनौपचारिक बैठक का घेऊ शकत नाही, असा भेदक सवालही अब्दुल्ला यांनी विचारला आहे. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने आज पत्रकारांसमोर देशाची बाजू मांडली. 

मोदी 17 ला मालदीवमध्ये 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 नोव्हेंबरला मालदीवच्या दौऱ्यावर जातील असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्या देशाचे नवे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथग्रहण समारंभात मोदी भाग घेतील असेही कुमार यांनी सांगितले. कर्तारपूर मार्ग खुला करण्याबाबत कुमार यांनी सांगितले, की यावर चर्चा सुरू आहे; पण पाकिस्तानच्या वतीने अद्याप अधिकृतरीत्या भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com