Delhi Election : काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; कोणी कोणावर केले आरोप

वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

  • चाकोंकडून दीक्षितांवर खापर
  • शर्मिष्ठा मुखर्जी चिदंबरम यांच्यावर नाराज

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपला पराभूत करण्याची जबाबदारीही बाहेरच्या लोकांना द्यायची का, असा खोचक सवाल काही नेत्यांकडून विचारला जात आहे. प्रभारीपदाचा राजीनामा देणारे वरिष्ठ नेते. पी. सी. चाको यांनी या पराभवाचे खापर दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर फोडले आहे. दीक्षित यांच्याकडे २०१३ मध्ये जेव्हा पक्षाची सूत्रे होती, तेव्हापासूनच काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली अन्‌ पक्षाचा पारंपरिक मतदार ‘आप’कडे वळू लागला, असा आरोप चाको यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही ‘आप’च्या विजयाबद्दल त्यांचे स्वागत करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली. अन्य पक्षांकडे भाजपच्या पराभवाची जबाबदारी सोपवायची असेल तर काँग्रेसने आपले दुकान बंद करायचे का? असा सवाल मुखर्जी यांनी केला आहे. हे करायचे नसेल तर ‘आप’च्या विजयाने तुम्ही आनंदित होण्याचे कारणच काय? असा सवालही मुखर्जी यांनी चिदंबरम यांना केला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या होत.

मिलिंद देवरांची नाराजी
चाको यांच्या टीकेवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही नाराजी व्यक्त केली. शीलाजींनी त्यांचे सर्व आयुष्यच काँग्रेससाठी समर्पित केले होते, असे देवरा यांनी म्हटले आहे. शशी थरूर यांनी पक्षाच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘‘दिल्लीचे निकाल काँग्रेसला निराश करणारे असले तरीसुद्धा काही प्रमाणात पक्षाला दिलासाही मिळाला आहे. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला जनतेने नाकारले असून, आम आदमी पक्षाच्या विकासाच्या मुद्याला पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आठच महिन्यांमध्ये विजेत्यांना मोठा धक्का बसला आहे, असे थरूर यांनी स्पष्ट केले.

चाको यांचा राजीनामा
आखिल भारतीय काँग्रेस समितीचे दिल्ली प्रभारी पी. सी. चाको यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत चाको यांनी त्यांचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: internal crisis in congress over delhi election