शरीफ चाचांनाही राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण; जाणून घ्या कोण आहेत ते

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 4 August 2020

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडक लोकांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडक लोकांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिले निमंत्रण बाबरी मशिदचे पक्षकार राहिलेले हाशिम अंसारी यांचे पुत्र इकबाल अंसारी यांना देण्यात आले आहे. निमंत्रण यादीमध्ये असणारे आणखी एक नाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, ते म्हणजे मोहम्मद शरीफ यांचे.

अयोध्येतील निमंत्रितांना देण्यात येणार खास चांदीचा शिक्का; पाहा फोटो

पद्मश्रीने सन्मानित आहेत मोहम्मद शरीफ

भाजप सरकारने यावर्षी मोहम्मद शरीफ यांचा पद्मश्री देऊन सन्मान केला आहे. अयोध्येच्या खिडकी अली बेग गल्लीमध्ये राहणारे शरीफ बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करतात. विशेष म्हणजे हे करताना ते धर्म पाहत नाहीत. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 25 हजार मृतदेहांवर अंतिम संस्कार केला आहे. शरीफ यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. अयोध्येत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी ते उत्सुक आहेत. 

मुलाच्या हत्येने त्यांचं जीवन बदलले

बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यामागे शरीफ यांची एक कहानी आहे.  शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय कामात होता. सुलतानपूरमध्ये त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. त्यानंतर शरीफ यांनी बेवारस मृतदेहांना शोधून त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्याची शपथ घेतली. शरीफ सांगतात की, 27 वर्षांपूर्वी सुलतानपूरमध्ये माझ्या मुलाची हत्या झाली. मला याबाबत एका महिन्यानंतर बातमी मिळाली. त्यानंतर मी बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याचं काम सुरु केलं. 

अबब ! राम मंदिरासाठी त्यांनी तब्बल २३ वर्षे  घातली नाही पायात चप्पल

'शरीफ चाचा' नावाने आहेत प्रसिद्ध

अयोध्येमध्ये ते शरीफ चाचा नावाने ओळखले जातात. शरीफ चाचा म्हणतात, माझ्यात जीव असेपर्यंत मी बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करत राहणार आहे.  या कार्यानेच मला शांती लाभते. मी गेल्या 27 वर्षांपासून हे काम करत आहेत. मोदी सरकारने माझ्या कामाची दखल घेतली आणि माझा सन्मान केला. यामुळे मी आनंदी आहे, असं ते म्हणाले आहेत. 

इकबाल अंसारी यांना पहिलं निमंत्रण

बाबरी मशिदचे पक्षकार राहिलेले इकबाल अंसारी यांना भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण देण्यात आले आहे. अंसारी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, रामाची इच्छा असल्यामुळेच त्यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मंदिर निर्माण कार्यात भाग घेण्याची संधी मिळाली. भगवान राम हे कोणा एकट्याचे नाहीत, ते सर्व समुदायाचे आहेत. आम्ही त्यांच्याच नगरीत राहतो. त्यामुळे माझ्यासाठी सौभ्याची गोष्ट आहे की मला या सोहळ्याला उपस्थित राहता येत आहे. बाबरी मशिदचे अन्य एक मुस्लिम पक्षकार हाजी महबूब यांनाही भूमि पूजन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Invitation to mohamad Sharif for Ram Mandir Bhumi Pujan ceremony