कानपूरजवळील रेल्वे दुर्घटनेमागे 'आयएसआय'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

कानपूरजवळ 20 नोव्हेंबरला इंदूर-पाटणा या रेल्वेगाडीचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 150 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी बिहार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मोतीहारी - कानपूरजवळ नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'चा हात असल्याची शक्यता बिहार पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

कानपूरजवळ 20 नोव्हेंबरला इंदूर-पाटणा या रेल्वेगाडीचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 150 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी बिहार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांचा आयएसआयशी संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणी एटीएस आणि केंद्रीय गुप्तहेर संघटनांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे, असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे. मोती पासवान, उमा शंकर पटेल आणि मुकेश यादव अशी या तिघांची नावे आहेत. नेपाळमध्येही यांचा संपर्क असल्याचे समोर आले आहे. या तिघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या तिघांना नेपाळमधील ब्रिजेश गिरी या व्यक्तीकडून तीन लाख रुपये मिळाले आहेत. गिरी याचे दुबईतील शामसुल हुडा या व्यक्तीशी संबंध असून, हुडा हा आयएसआयचा हस्तक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: ISI Role Suspected In Indore-Patna Express Train Derailment In Kanpur