आता देशाच्या सीमांवर इस्त्रोची नजर
पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान दिवस-रात्र सीमेवर पहारा देतात. मात्र तरीही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे आणि हल्ल्यांचे प्रयत्न होतात. मात्र आता ही घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान दिवस-रात्र सीमेवर पहारा देतात. मात्र तरीही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे आणि हल्ल्यांचे प्रयत्न होतात. मात्र आता ही घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे.
सीमेवर तैनात असलेल्या सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबद्दलच्या सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं गृह मंत्रालयाला अहवाल सुपूर्द केला. यामध्ये सीमा सुरक्षेत वाढ करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासोबतच अंतराळ तंत्रज्ञान वापरण्याचा सल्लादेखील देण्यात आला. यासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलांना अत्याधुनिक उपकरणं देण्यात येणार आहेत.
दरम्यान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांच्या सीमांवर नजर ठेवण्यासाठी इस्रो एक विशेष उपग्रह लॉन्च करणार आहे. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना समितीनं सरकारला केली होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही सूचना स्वीकारली. येत्या 5 वर्षांमध्ये गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालयासोबत या योजनेवर काम करेल.