'GSLV MK-3'च्या उड्डाणासाठी 'इस्रो' सज्ज

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

भारतीय अवकाशवीराला अवकाशात नेण्यासाठी ही क्षमता पुरेशी आहे; मात्र यासाठी तीन ते चार अब्ज डॉलरचा निधी आवश्‍यक असून, केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास दोन ते तीन जणांना अवकाशात पाठविण्याचा "इस्रो'चा आराखडा तयार आहे.

नवी दिल्ली : 'भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट' असे वर्णन केल्या जाणाऱ्या 'जीएसएलव्ही एमके-3' या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी आज सांगितले. पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

'जीएसएलव्ही एमके-3' हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. याद्वारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास 'इस्रो' सिद्ध आहे, असे किरणकुमार यांनी सांगितले. या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटद्वारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल, असा विश्‍वास किरणकुमार यांनी व्यक्त केला.

पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत 8 टनांपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची 'जीएसएलव्ही एमके-3'ची क्षमता आहे. भारतीय अवकाशवीराला अवकाशात नेण्यासाठी ही क्षमता पुरेशी आहे; मात्र यासाठी तीन ते चार अब्ज डॉलरचा निधी आवश्‍यक असून, केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास दोन ते तीन जणांना अवकाशात पाठविण्याचा 'इस्रो'चा आराखडा तयार आहे. या आराखड्यावर अंमलबजावणी झाल्यास मानवाला अवकाशात नेऊ शकणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर केवळ चौथा देश असेल. भारतातर्फे अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती एक महिला असू शकते, असे सूतोवाचही किरणकुमार यांनी केले.

'जीएसएलव्ही एमके-3' हे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी शून्यातून तयार केले असल्याने या 'हत्ती'ला पहिल्याच प्रयत्नात माणसाळण्याचा 'इस्रो'चा प्रयत्न असेल. अर्थात, नव्या रॉकेटच्या पहिल्या उड्डाणात अनेकदा 'इस्रो'ला अपयश आले आहे. भारताचे 'पीएसएलव्ही' हे 1993 च्या पहिल्या उड्डाणात अयशस्वी ठरले होते. त्यानंतर मात्र या रॉकेटने सलग 38 यशस्वी उड्डाणे केली आहेत. 'जीएसएलव्ही एमके-1'चेही पहिले उड्डाण अयशस्वी झाले होते. ही परंपरा यंदा मोडली जाण्याची आशा आहे.

'जीएसएलव्ही एमके-3' ची वैशिष्ट्ये
640 टन : वजन (जंबो जेट विमानाच्या पाच पट)
4 टन : वजन वर्गातील उपग्रह नेण्याची क्षमता
43 मीटर : उंची
300 कोटी : रॉकेटचा निर्मिती खर्च

Web Title: ISRO ready for GSLV MK-3 take off