सामर्थ्यशाली ‘कार्टोसॅट-३’चे यशस्वी प्रक्षेपण

पीटीआय
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) उच्च प्रतीची पृथ्वीची छायाचित्रे काढू शकणाऱ्या ‘कार्टोसॅट-३’ या उपग्रहाचे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले.

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) उच्च प्रतीची पृथ्वीची छायाचित्रे काढू शकणाऱ्या ‘कार्टोसॅट-३’ या उपग्रहाचे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेचे १३ लघू उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले. ‘कार्टोसॅट-३’ चे उड्डाण हे मोठे यश आहे, असे वर्णन ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल ‘इस्रो’चे अभिनंदन केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

‘इस्रो’ने आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उड्डाणतळावरून  ४४.४ मीटर उंचीच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी ४७) ‘कार्टोसॅट-३’चे प्रक्षेपण केले. उड्डाणानंतर १७ मिनिटे आणि ४६ सेकंदांनी हा उपग्रह ‘सन सिंक्रोनस’ कक्षेत पोचला. अमेरिकेचे सर्व १३ लघू उपग्रह हे २६ मिनिटे ५६ सेकंदांनी कक्षेत सोडण्यात आले, अशी माहिती ‘इस्रो’ने दिली. ‘चांद्रयान २’नंतर ही ‘इस्रो’ची पहिलीच मोहीम होती. पृथ्वीची उच्च प्रतीची छायाचित्रे व त्रिमितीय नकाशे तयार करू शकणारा ‘कार्टोसॅट-३’ हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वांत आधुनिक उपग्रह आहे.

उपग्रह योग्य प्रकारे नियोजित कक्षेत सोडण्यात आल्याने सिवन आणि अन्य शास्त्रज्ञांनी आनंद साजरा केला. ‘चांद्रयान-२’ मोहीम १०० टक्के यशस्वी ठरली नाही. त्यामुळे चिंतित असलेले सिवन यांच्या चेहऱ्यावर आजच्या ‘कार्टोसॅट-३’च्या यशामुळे समाधान झळकत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isro successfully launches CARTOSAT-3