"जीएसएलव्ही एमके-3' चे यशस्वी प्रक्षेपण

पीटीआय
सोमवार, 5 जून 2017

जीएसएलव्ही एमके-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत पुढच्या पिढीतील प्रक्षेपक व उपग्रहाच्या क्षमतेजवळ जाऊन पोचला आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-3 या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) आज श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

जीएसएलव्ही एमके-3 हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक असून, त्यात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक या शक्तिशाली इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. आज सतीश धवन केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला. या प्रक्षेपकाद्वारे 3.13 टन वजनाचा "जी सॅट-19' हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला असून, प्रक्षेपनानंतर 16 मिनिटांनी तो अवकाशात सोडण्यात आला. आगामी काळात या प्रक्षेपकाद्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठविणेही शक्‍य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या यशस्वी प्रक्षेपणामुळे चार टन वजनाचे उपग्रह स्वबळावर अवकाशात पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून, यापूर्वी 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती, मात्र, हे अवलंबित्व आता संपुष्टात आले आहे.

जीएसएलव्ही एमके-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत पुढच्या पिढीतील प्रक्षेपक व उपग्रहाच्या क्षमतेजवळ जाऊन पोचला आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

इस्त्रोने सर्वांत मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून ऐतिहासिक कामगिरी केली असून, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती

Web Title: ISRO's most powerful rocket successfully launched