गोमांस विक्रीवरून मुस्लिम व्यक्तीला मारहाण; खायला दिले डुकराचे मांस

पीटीआय
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- जमावाने केली मारहाण.

- खायला दिले डुकराचे मांस.

तेजपूर (आसाम) : गोमांसविक्रीवरून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करीत डुकराचे मांस खाण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना येथे घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शौकत अली (वय 48) असे असून, सध्या त्यांच्यावर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्‍वनाथ जिल्ह्यामध्ये रविवारी मधुपूर आठवडी बाजारामध्ये हा प्रकार घडल्याचे पोलिस निरीक्षक राकेश रोशन यांनी सांगितले. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. या जमावातील काही लोक शौकत अलीला घेराओ घालून त्यांना त्यांचे नाव, गाव आणि पत्ता विचारत मारहाण करीत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, अली यांना मारहाण करणारे आरोपी हे स्थानिक असून, त्यांचा मूलतत्त्ववादी संघटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याच भागामध्ये अली यांचे खाद्यपदार्थ विक्रीचेदेखील दुकान आहे.

हल्लेखोरांनी मारहाण करीत आपल्याला डुकराचे मांस खायला घातल्याचा दावा अली यांनी केला असला, तरीसुद्धा पोलिसांनी मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही. अली यांच्या दाव्याची चौकशी होणे गरजेचे असून, त्यानंतरच वास्तव समोर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

अली यांची खंत 

याच व्यापारपेठेमध्ये आपण मागील तीन दशकांहून अधिक काळ गोमांस विकत होतो. पण, आपल्याला कधीच अशा प्रकारची वागणूक मिळाली नव्हती, अशी खंत अली यांनी व्यक्त केली आहे. या व्यापारपेठेचा कंत्राटदार कमल थापा यालाही मारहाण करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, गोवंशहत्याबंदी कायदा आसाममध्ये लागू नसून असे असतानाही संबंधित व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

Web Title: Issue of Beef Selling mob beaten to a Muslim person in Assam