गोव्यात झुआरी पुलासाठी खाजनात भराव; खारफुटीची कत्तल

अवित बगळे
Sunday, 22 December 2019

- गोव्यात झुआरी पुलासाठी खाजनात भराव, खारफुटीची कत्तल

- संयुक्त पाहणीत उघड, आता राष्ट्रीय हरीत लवादासमोर चालणार खटला

पणजी : दक्षिण-गोवा उत्तर गोव्याशी जोडणाऱ्या झुआरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलासाठी खाजन जमिनीत भराव टाकण्यात आला आहे. त्याशिवाय खारफुटीची कत्तल करूनही भराव घालण्यात आला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार केलेल्या संयुक्त पाहणीत ही बाब समोर आली असून, तो भराव काढण्याची शिफारस कऱण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर हा पूल बांधण्यात येत आहे. रेनबो वॉरीयर्स या बिगर सरकारी संस्थेने याविषयी लवादासमोर दाद मागितली आहे. त्यांनी दावा केला आहे, की बांधकाम साहित्याची, रोडारोडाची विल्हेवाट सागरी अधिनियम क्षेत्रात लावण्यात येत आहे. कांदळवने संरक्षण व व्यवस्थापनाचा आराखडा काम सुरु करण्यापूर्वी सादर करण्यात आला नाही. ध्वनी प्रदूषण व जलप्रदूषणाच्या मापनाची निरंतर व्यवस्था करण्यात आली नाही. पुलाच्या सलग्न कामांसाठी खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे.

संजय राऊत बोलले तरी, मीच पक्षाचा अध्यक्ष : शरद पवार 

याविषयीच्या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर लवादाने प्रत्यक्ष पाहणीचा आदेश दिला होता. त्यानंतर केलेल्या पाहणीवेळी याचिकादारांकडून अभिजित प्रभुदेसाई, जॉन फर्नांडिस व डायना तावारीस तसेच तज्ज्ञ सदस्य डॉ. प्रभाकर शिरोडकर, अभियंते अवधूत भौंसुले, भू जमाबंदी खात्याचे देवेंद्र गावकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे गणपत नाईक, रवी नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सागर शेट, दिलीप बिल्डकॉनकडून ब्रह्मैय्या उपस्थित होते.

एकूण सहा ठिकाणी ही पाहणी करण्यात आली. याविषयीच्या पाहणी अहवालात म्हटले आहे, की आगशी येथे खाजन जमिनीत भराव घालून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था कऱण्यात आली आहे. पुलाचे काम झाल्यावर तो भराव काढून जमीन पूर्ववत करण्याची गरज आहे. पुलाचे कामही बहुतेक ठिकाणी पूर्ण होत आले आहे तेथील कामानी उचलल्यावर भराव काढला गेला पाहिजे.

कंत्राटदारांने उभारलेल्या तात्पुरत्या शेडकडे जाण्यासाठी भराव घालून तात्पुरता रस्ता केला आहे. तो रस्ता जनहितासाठी नसल्याने तत्काळ तो भराव काढण्यात यावा. गोवा वेल्हा येथे पश्चिमेच्या दिशेला विनाकारण खाजन जमिनीत भराव घातला असून तो काढण्यात यावा.

गांधीगिरी संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

शिरदोन येथे खारफुटी कापून भराव घातला आहे. काम पूर्ण झाल्यावर भराव काढून ती जमीन पूर्ववत केली पाहिजे. कांदळवन संरक्षण व व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला जावा आणि त्यानुसार खारफुटींची फेरलागवड केली जावी.

रेल्वे पुलाच्या विरुद्ध बाजूने आयोग्य पद्धतीने डोंगर कापणी झाली आहे, तेथे दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना केली जावी. या पाहणीवेळी झुआरीवरील सध्याच्या पुलाला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले. झुआऱीच्या पश्चिम किनाऱ्याची धूप होत आहे.

मारूती मंदिराच्या खालच्या भागात हा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यावर उपाययोजना करण्याची शिफारस या पाहणी अहवालात करण्यात आली आहे. लवादाने आपल्या आदेशात कोणत्या खात्याने काय केले पाहिजे याच आदेश जारी केला असून, 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue of Zuari Bridge will raise in National Green Arbitration