
धार्मिक स्थळं 'जैसे थे' ठेवण्याच्या कायद्याचा भंग होतोय : ओवैसी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीदीवरुन सध्या बराच खल सुरु आहे. या मंदिराच्या सर्वेक्षणाचे आदेश आजच अलहाबाद हायकोर्टाने दिले आहेत. शिवमंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद बांधल्याचा दावा करण्यात येत आहे. पण कोर्टाचा आदेश चुकीचा असल्याचं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळं आहे त्या स्थितीत ठेवण्याच्या कायद्याचा भंग होतोय, असा दावाही त्यांनी यावेळी केला. या घटनांमागे भाजप आणि आरएसएस असल्याचा आरोप करत तुम्ही देश संविधानावर चालवणार की धार्मिक आस्थेवर? असा सवालही त्यांनी भाजपला केला. (It is a violation of the law to keep religious places as It is says Asduddin Owaisi)
हेही वाचा: धमकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
एबीपी न्यूजनं घेतलेल्या मुलाखतीत ओवैसी बोलत होते. ओवैसी म्हणाले, ज्या प्रकारे बाबरी मशिदीला आमच्याकडून हिसकावण्यात आलं, तोच प्रकार पुन्हा केला जात आहे. आम्ही एक मशीद गमावली आहे आता दुसरी गमवायची नाही. १९९१ मध्येच हायकोर्टानं ज्ञानवापी मंदिराबाबत स्थगिती दिली होती. तो आदेश तुम्ही मानत नाहीत. त्यानंतर एक पक्ष जाऊन तिथं सर्वेक्षण करण्याची मागणी करतो आणि ठाराविक व्यक्तीलाच या सर्वेक्षणाचे अधिकार देण्याची मागणी करतो. आम्हाला सर्वे नको आहे पण तुम्ही आमच्यावर तो थोपवत आहात. त्यामुळं कोर्टाला भारताच्या कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा लागेल. त्यासाठी पर्सनल लॉ बोर्ड आणि त्या मशीदचे लोक तात्काळ सुप्रीम कोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग होतोय, ही बाब समोर ठेवतील.
देश संविधानावर चालवणार की धार्मिक आस्थेवर?
उद्या मी कोर्टात जाऊन सांगेन की, पंतप्रधानांच्या घराखाली मशीद होती किंवा भारताच्या गुप्तचर विभागाच्या कार्यालयाखाली मशीद होती तर तुम्ही मला तिथं खोदाई करण्याची परवानगी द्याल का? कोण काय म्हणतं ही गोष्ट वेगळी पण आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे. माझा मशीदीच्या सर्वेक्षणाला विरोध आहे यासाठी मी सन १९९१चा कायदा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश हा पुरावा देतो. १९९१ च्या संसदेतील कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी जी धार्मिक स्थळं आहेत त्यांच्या ढाच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही असं म्हटलं होतं. यामध्ये केवळ बाबरी मशिदीला वगळण्यात आलं होतं. पण हेतुपुरस्सर आरएसएस आणि भाजपचा तमाशा सुरु आहे. कारण देशाला पुन्हा १९९० मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. १८-२० वयाच्या मुलांची माथी भडकवयाची कामं तुम्ही करत आहात. हिंदुत्वाच्या विचारधारेनं तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानणार नाही का? तुम्ही देश संविधानावर चालवणार की धार्मिक आस्थेवर चालवणार? असा सवालही यावेळी ओवैसी यांनी केला.
भाजप-आरएसएसवर केली सडकून टीका
देशातील मुस्लिमांच्या सांस्कृतीक निशाणी कायमच्या मिटवल्या जाव्यात. हिंदुत्वाची विचारसरणी थोपवली जावी. तुम्ही कायदे मानणार की सुप्रीम कोर्टाचा निर्णय? फक्त हिंदुत्वाची विचारसरणी थोपवणार. मुस्लीम व्यक्ती केवळ घरात मुस्लीम राहिलं बाहेर मुस्लीम राहणार नाही, हे सर्व भाजपनं ठरवलं आहे. पण मला हे मान्य नाही. मी घरातही आणि बाहेरही मुस्लीम राहणार. कारण संविधानानं मला याचा अधिकार दिला आहे. यावेळी त्यांनी भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीवरही सडकून टीका केली. जेव्हा मुस्लिमांचा मुद्दा येतो तेव्हा हे तिनही पक्ष अंधळे आणि बहिरे होऊन जातात, असं ओवैसी म्हणाले.
Web Title: It Is A Violation Of The Law To Keep Religious Places As It Is Says Asduddin Owaisi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..