भाजपचा नवा कारभारी ठरला; कार्यकारी अध्यक्ष नियुक्त

भाजपचा नवा कारभारी ठरला; कार्यकारी अध्यक्ष नियुक्त

नवी दिल्ली: ज्येष्ठ भाजप नेते व माजी आरोग्यमंत्री जगतप्रकाश ऊर्फ जे. पी. नड्डा (वय 64) यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नड्डा यांचे नाव नव्या पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अग्रेसर असल्याचे वृत्त "सकाळ'ने यापूर्वीच दिले आहे. 

पक्षाध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदावर गेल्यानंतर व त्यांचा दुसऱ्या वेळेचाही कार्यकाळ संपत आल्याने नव्या पक्षाध्यक्षांकडे सूत्रे देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच शहा यांनी घेतला. मात्र नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनविल्याने तूर्त शहा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे राहणार हे स्पष्ट आहे. भाजप संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत ते या पदावर राहतील, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. शहा यांनी आज दुपारी देशातील सर्व राज्यांच्या सदस्यत्व मोहीम प्रमुखांची बैठक घेतली, तेव्हा नड्डा यांना जास्त वेळ बोलण्याची संधी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

येत्या वर्षात होणाऱ्या झारखंड, हरियाना व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नड्डा यांच्या कामाचा व संघटन कौशल्याचा कस लागेल व नंतर त्यांना पूर्णवेळ पक्षाध्यक्ष बनविण्याबाबतचा निर्णय अमलात येईल. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नड्डा यांनी यापूर्वी काम केले आहे व 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय त्यांनीच अधिकृतरीत्या जाहीर केला होता. 

नड्डा यांच्या नियुक्तीनंतर मोदी, शहा व राजनाथसिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले. राजनाथसिंह म्हणाले, की अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक निवडणुका लागोपाठ जिंकल्या आहेत. मात्र केंद्रात मंत्रिपदी गेल्यावर आपल्याला पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असा आग्रह शहा यांनीच धरला होता. त्यामुळे संसदीय मंडळाने आजच्या बैठकीत नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला. 

अभाविपची पार्श्‍वभूमी लाभलेले नड्डा हे प्रसिद्धीच्या वलयात न राहता काम तडीस नेण्यासाठी प्रख्यात आहेत. मूळचे बिहारमधील असलेले नड्डा हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय होते. नितीन गडकरी यांच्या काळात व त्यांच्याच पुढाकाराने 2010 मध्ये नड्डा यांना दिल्लीत आणण्यात आले व त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या देण्यास भाजपने सुरवात केली. 2014 मध्येही भाजप अध्यक्षपदासाठी त्यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र मोदी यांच्या मनात शहा यांचे नाव होते. आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी पीएमओला न दुखावता आपल्या मनातील योजना प्रत्यक्षात आणल्या. मोदींच्या स्वप्नातील "आयुष्मान भारत'चा जो आराखडा त्यांनी तयार केला तो मोदींवर प्रभाव पाडणारा ठरला. 

उत्तर प्रदेशात यश 
शहा यांनी अलीकडेच 2019 मध्ये नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशातील अतिशय अवघड कामगिरी सोपविली व गोवर्धन झाडापियांच्या मदतीने नड्डा यांनी राज्यातील 64 जागा पुन्हा जिंकण्याची कामगिरी करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे नाव झळकले नाही. मात्र त्याच्याही आधीपासून नड्डा यांच्याकडे भाजप अत्यंत कळीची जबाबदारी सोपविणार असल्याची चर्चा होती ती आज खरी ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com