Covid Vaccine
Covid VaccineSakal

‘जान है तो जहान है’

नवी दिल्ली : लसीकरणाबाबत व लसीबाबत अल्पसंख्याक समाजाच्या मनातील वाढती शंकाकुशंका व भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘जान है तो जहान है" ही जनजागृती मोहीम येत्या योगदिनापासून (ता. २१ जून) देशभरात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अल्पसंख्याक धर्मगुरूंचेही सक्रिय साहाय्य घेतले जाणार आहे. आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योगदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिल्लीत निवडक पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की ‘जान है तो जहान है’ मोहिमेत ग्रामीण-दुर्गम भाग व अल्पसंख्याक बहुल भागांत जनजागृतीची मोठी मोहीम राबविण्यात येईल. विविध धार्मिक संघटना व मदरसे, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामीण सहकारी संस्था आदींमध्ये मंत्रालयाचे स्वयंसेवक जाऊन लसीकरणाबाबतच्या कुशंकांना उत्तरे देऊन शंकानिरसन करतील.

राज्यांराज्यांतील हज समित्या, वक्फ बोर्ड, वक्फच्या शैक्षणिक संस्था, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या ‘नई रोशनी’ योजनेतील महिला यांचीही सक्रिय मदत घेतली जाईल. ग्रामीण भाग व अल्पसंख्याकांच्या निवासी भागात मान्यवरांचे संदेश पोहोचविण्यात येतील. लघुपट, पथनाट्य व कविता वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. उत्तर प्रदेशात रामपूर येथे होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमाला नक्वी स्वतः उपस्थित राहतील. लसीकरणाबाबत काही स्वार्थी लोक शंका उपस्थित करत आहेत व हे लोक सामाजिक स्वास्थ्याचे शत्रू आहेत, हे लोकांच्या मनावर यानिमित्ताने ठसविले जाणार आहे.

या मान्यवरांचे संदेश

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी; फतेहपुरी मशिदीचे इमाम डॉ. मुफ़्ती मुक्कर्रम अहमद, जैन धर्म गुरू आचार्य लोकेश मुनी, दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा; अजमेर शरीफ दर्ग्याचे सय्यद जैनुल आबेदीन; अंजुमन सैयद जाद, अध्यक्ष हाजी सय्यद मोईन हुसैन, ऑल इंडियाचे सय्यद नसरुद्दीन चिश्ती, हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख सय्यद हम्माद निजामी, दिल्लीच्या शिया मशिदीचे शाही इमाम मौलाना मोहंमद अली मोहसीन तक़वी, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तारिक मन्सूर; ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमेर अहमद इलियासी, प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉ. माजेद तुरेल, जियो पारसीचे डॉ. शेरनाज कामा व चित्रपट, नाट्य, साहित्य क्षेत्रातील नामांकितांचेही लसीकरण जागृतीचे संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com