esakal | पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

pune lohegaon airport accident pune delhi flight 15 february 2020

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : दिल्लीकडे उड्डाण करताना एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर सर्व्हिस व्हॅनला घासले गेल्याचा धक्कादायक प्रकार लोहगाव विमानतळावर शनिवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. ते विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले. दरम्यान, हवाई दलाने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एअर इंडियाचे ‘एआय-८५२’ या विमानाच्या बाबत हा प्रकार घडला आहे. एअरबस कंपनीचे ते विमान होते.  या विमानाची उड्डाणाची नियोजित वेळ सकाळी सात वाजून ४० मिनिटे होती. मात्र, ते सात वाजून ५५ मिनिटांनी टेकऑफ झाले. ताशी २२० किलोमीटर वेगाने ते जात असताना धावपट्टीवर सर्व्हिस व्हॅन आली.  प्रचंड वेगातील विमान थांबविणे आणि पुढे नेणे शक्य नव्हते. पायलटने विमानतळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि मार्गावर अलिकडूनच उड्डाण केले.  हवेत झेपावताना विमानाच्या मधल्या आणि मागील बाजूस व्हॅनचा  काही भाग घासला गेला. त्या मुळे विमानाला काही प्रमाणात ओरखडे पडल्याचे दिल्लीत उतरल्यावर दिसून आले. दिल्लीतून हे विमान श्रीनगरसाठी रवाना होणार होते. मात्र, या प्रकारामुळे विमानाचे श्रीनगरचे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनातील सूत्रांनी दिली.

आणखी वाचा - पुणे-सातारा हायवेवर उद्या मार्गात बदल

आणखी वाचा - क्रेनला ओव्हरटेक करायला गेला अन...
 
पायलटचे प्रसंगावधान 
लोहगाव विमानाची धावपट्टी सुमारे 2500 मीटरची आहे. या धावपट्टीवर सर्व्हिस व्हॅन दिसल्यावर पायलटने अलिकडूनच उड्डाण केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, असे सूत्रांनी सांगितले. विमान सुखरूपपणे हवेत झेपावले आणि दिल्लीत सुखरूप उतरल्यावर पायलटने सुटकेचा निःश्वास सोडला. या विमानात 180 प्रवासी होते. दरम्यान, हवाई दलाने या घटनेला एका निवेदनाद्वारे पुष्टी दिली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर विमानतळ प्रशासनही या बाबत तपास करीत असल्याचे लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी सांगितले. विमानाच्या उड्डाणाच्या वेळी धावपट्टीवरच विमानाच्या मार्गात सर्व्हिस व्हॅन  कशी पोचली, हा चौकशीचा केंद्रबिंदू असल्याचे समजते.

loading image
go to top