मेहबूबांचे सत्तास्वप्न भंगले; राज्यपालांकडून विधानसभा बरखास्त 

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti

श्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि "नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही पक्षांचा आधार घेत जम्मू- काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आघाडीतील पक्षाचे सत्ता स्थापनेचे गुलाबी स्वप्न भंगले. 

सत्ता स्थापनेसंदर्भातील पत्र मेहबूबा यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पाठविल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल मलिक यांनी विधानसभाच विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही राज्यपाल मलिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण आमचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे मेहबूबा यांनी म्हटले आहे. मेहबूबा यांच्या पाठोपाठ "पीपल्स कॉन्फरन्स'चे अध्यक्ष सज्जाद लोन यांनीही सरकार स्थापनेचा दावा केला होता. लोन यांनी व्हॉट्‌सऍपवरून राज्यपालांच्या स्वीय सहाय्यकाला या संदर्भातील पत्र पाठविले होते. भाजप आणि अन्य अठरा आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केला होता. 

नवे आघाडीकारण 
जम्मू काश्‍मीरमध्ये मेहबूबा यांच्या पुढाकाराने नवे आघाडीकारण आकाराला येऊ लागले असून भाजपला एकाकी पाडण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस या अन्य दोन पक्षांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळपासूनच या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले होते. माकपचे ज्येष्ठ नेते एम. वाय. तारिगामी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने "पीडीपी'बाबत मवाळ भूमिका घेतली होती. 

उमर अब्दुल्लांची नाराजी 
दरम्यान, राज्यातील राज्यपाल राजवट संपून लवकर विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात म्हणून "नॅशनल कॉन्फरन्स'देखील आग्रही होते. पण "पीडीपी'ने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केल्याने उमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राजभवनाशी तत्काळ संपर्क होऊ न शकल्याबद्दल अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला; तसेच राजभवनातील फॅक्‍स मशीन तातडीने दुरुस्त केली जावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com