जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरतावाद्यांच्या कानशिलात लगावली; निकालानंतर भाजपची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 23 December 2020

भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या  (Jammu and Kashmir)  लोकांनी दहशतवादी, अराजकतावादी आणि फुटीरतावादी यांच्या चेहऱ्यावर जोरदार चापट लगावली आहे, अशी प्रतिक्रीया जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या (DDC Election) निवडणुकीतील निकालानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षात पहिल्यांच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ''भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे सिद्ध होतं की लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापक दृष्टीकोणाला प्राथमिकता दिली आहे. सात पक्षांनी मिळून गुपकार आघाडी बनवली. त्यांना माहिती होतं की भाजपसोबत सामना करणे अवघड आहे.'' रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत अंतिम निकाल हाती आले असल्याचं जाहीर केलं. 

पोप फ्रान्सिस यांचं पुन्हा एकदा 'लाईक' घसरलं; सोशल मीडियावर चर्चेचा...

जम्मू-काश्मीरमध्ये कमळ फुललं आहे. भाजपने काश्मीर खोऱ्यात 3 जागा जिंकल्या आहेत. येथे नेशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी आणि स्थानिक पक्षांचा बोलबाला असायचा. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्याठिकाणी मतदानाचे प्रमाण वाढले आहे, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले. 

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनी भाजपवर टीका केली. भाजप सरकार आता इथं लवकर विधानसभा निवडणुका घेणार नाही. इथं झालेल्या पराभवानंतर मला नाही वाटत की भाजप इथं लवकर विधानसभा निवडणुका घेईल. जर त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर आतापर्यंत निवडणुकांची घोषणा केली असती. आता आमच्याकडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणखी वेळ असेल, असं ते म्हणाले आहेत. 

अयोध्येतील नव्या मशिदीवरून वाद; शरियतचं उल्लंघन होत असल्याचं मत

जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाजपला 78 जागा मिळाल्या आहेत. उमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फ्रन्सला 67 जागा मिळाल्या आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला 26 जागा मिळाल्या. गुपकार आघाडीला एकूण 110 जागा जिंकता आल्या. भाजपला 4.5 लाख मतं मिळाली आहेत, नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांपैकी ते जास्त आहेत. रविशंकर प्रसाद यांनी दावा केलाय की, 39 अपक्ष विजयी उमेदवारांचा भाजपला पाठिंबा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir DDC Election bjp ravishankar prasad criticize gupkar