जम्मू-काश्‍मीर, लडाख भारताचेच; चीनला फटकारले 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 16 October 2020

लडाख, जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश यासंदर्भातील भारताची भूमिका चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला अनेक वेळेस स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे विनाकारण वारंवार या मुद्यांची पुनरुक्ती करणे अयोग्य आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांच्याबाबत टिप्पणी करण्याचा कुणाला अधिकार नाही, अशा शब्दात भारताने आज चीनला फटकारले. दुसरीकडे वाटाघाटीची तयारी दाखविल्याचा पाकिस्तानचा दावाही भारताने फेटाळून लावला. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी लष्कराला सुसज्ज राहण्याचे केलेले ताजे आवाहन तसेच भारत-चीन सीमाभागात भारतातर्फे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा याबद्दल चीनने व्यक्त केलेली नाराजी यासंदर्भात टिप्पणी करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, चीनतर्फे केले जाणारे मतप्रदर्शन हा भारताच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप ठरतो आणि कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाबाबत अशा प्रकारची वक्तव्ये करणे उचित नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लडाख, जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश यासंदर्भातील भारताची भूमिका चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाला अनेक वेळेस स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे विनाकारण वारंवार या मुद्यांची पुनरुक्ती करणे अयोग्य आहे. हे भाग भारताचे आहेत आणि त्याबाबत कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाणार नाही. या भागातील भारतीय नागिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. उभय देशातील सामरिक आणि अन्य करार ध्यानात ठेवूनच या भागाचा विकास व सुधारणा केल्या जात आहेत व यापुढेही त्या चालू राहतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत-चीन दरम्यान नुकत्याच झालेल्या चर्चेच्या सातव्या फेरीनंतर आणखी पुढे चर्चा होणार आहे काय या प्रश्‍नावर प्रवक्‍त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु सीमाप्रश्‍न हा किचकट आहे आणि चर्चेच्या माध्यमातून व शांतता टिकवूनच तो सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल ही भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाटाघाटींचा प्रश्‍नच नाही 
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताबरोबर वाटाघाटींची तयारी दर्शविण्याबद्दल व भारताच्या कथित अनुकूल प्रतिसादाच्या दाव्याबद्दल बोलताना अनुराग ठाकूर यांनी तो साफ फेटाळून लावला. पाकिस्तानतर्फे दहशतवाद्यांची घुसखोरी, त्यांना प्रोत्साहन व भारतविरोधी कारवायांना सर्व प्रकारची मदत केली जात असताना वाटाघाटींचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir, Ladakh and Arunachal Pradesh are integral parts of India