जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षादलाची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती की, कुलगाममधील चिंगामा भागात काही दहशतवादी लपून बसले असून ते मोठा कट रचत आहेत. यानंतर सुरक्षा बलाने स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफच्या एका तुकडीसह परिसराला घेराव घातला. सुरक्षादलाने घेरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. 

भारतीय सुरक्षादलांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितलं मात्र त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने गोळीबार केला. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबारावरून तीन दहशतवादी असण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना सुरक्षादलाने यमसदनी धाडलं. इतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

हे वाचा - भाजपशी जवळीकता नडली; काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी

याआधीही जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली होती. बुधवारी केलेल्या या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. पोलिसांनी सांगितलं होतं की, दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने मंगळवारी जैनपोरा भागात सुगान गावात शोधमोहिम सुरू केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu and kashmir two terrorists killed in encounter