जम्मू- काश्मीरला छावणीचे रूप

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
Jammu Kashmir camp Tight security backdrop Prime Minister Modi visit
Jammu Kashmir camp Tight security backdrop Prime Minister Modi visitsakal

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू- काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या असून खोऱ्यातील सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मोदी हे उद्या (ता.२४) रोजी सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीला भेट देणार असून त्यांच्या हस्ते वीस हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी करण्यात येईल.

सुजवानमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने दहशतवादी मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असावेत असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जम्मूपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पल्ली पंचायत परिसरामध्ये पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) देखील परिस्थितीवर करडी नजर ठेवून असेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जम्मू- काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. मोदींच्या सभेचे स्थळ हे जम्मू- पठाणकोट महामार्गापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असल्याने हा सगळा परिसर सील करण्यात आला असून तिथे सामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या सभेला जवळपास एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज बांधून तशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. पल्ली चौक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वारावर मोदींचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विकास प्रकल्पांचा धडाका

पंतप्रधानांच्या हस्ते आज बनिहाल- काझीगुंड या बोगद्याचे देखील उद्‍घाटन होणार असून राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला देखील भेट देणार आहेत. मोदींच्या हस्ते ज्या बनिहाल- काझीगुंड या बोगद्याचे उद्‍घाटन होणार आहे त्याची लांबी ही ८.४५ किलोमीटर एवढी असून त्याच्या निर्मितीवर ३ हजार १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दिल्ली- अमृतसर-कत्रा या एक्स्प्रेस वेचा पायाभरणी समारंभ देखील यावेळी पार पडणार आहे. जन औषधी केंद्राच्या नेटवर्कअंतर्गत उभारण्यात आलेल्या शंभर केंद्रांचे उद्या मोदींच्या हस्ते उद्‍घाटन होईल. पल्ली येथे उभारण्यात आलेल्या ५०० किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचेही मोदींच्या हस्ते उद्‍घाटन होणार असून यामुळे ही पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरणार आहे.

‘एनआयए’चे प्रमुख घटनास्थळी

जम्मू : जम्मूच्या ज्या सुजवान भागामध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता त्या भागाला राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख कुलदीप सिंग यांनी आज भेट देत पाहणी केली. ‘एनआयए’चे प्रमुख आज सायंकाळी जम्मूमध्ये पोचले, यावेळी त्यांच्यासोबत ‘सीआरपीएफ’चे पोलिस महानिरीक्षक पी.एस.रणपिसे (जम्मू सेक्टर) हे देखील उपस्थित होते. सिंग हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक असल्याने त्यांनी हल्ल्याची सगळी पार्श्वभूमी जाणून घेतली. सांबा जिल्ह्यात ज्या भागात मोदींची सभा होणार आहे त्यालाही ‘एनआयए’च्या प्रमुखांनी भेट देत आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com