काश्‍मीरमधील स्थितीत सुधारणा - राजनाथसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाच "सी' महत्त्वाचे

श्रीनगर: गेल्या एका वर्षात काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली असून, काश्‍मीरची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले.

कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाच "सी' महत्त्वाचे

श्रीनगर: गेल्या एका वर्षात काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली असून, काश्‍मीरची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले.

जम्मू-काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राजनाथसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काश्‍मीर मुद्याच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी इंग्रजीतील पाच "सी' महत्त्वाचे आहेत. यामध्ये यामध्ये दयाभाव, संवाद, सहअस्तित्व, आत्मविश्वासाची निर्मिती आणि सातत्य यांचा समावेश आहे.

ते म्हणाले, येथे शिष्टमंडळांना भेटल्यानंतर आणि बैठकांनंतर मला वाटते की, काश्‍मीरमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. मी हा दावा करू इच्छित नाही, की सर्वकाही पूर्णपणे ठीकठाक आहे. मात्र, स्थिती सुधारली आहे हे मी आत्मविश्‍वासाने सांगू शकतो. राजनाथसिंह यांनी या दौऱ्यात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांशी चर्चा केली असून, आता ते लष्कराच्या जवानांनाही भेटणार आहेत.

सरकार फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यास तयार आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, काश्‍मीरची समस्या सोडविण्यात आम्हाला मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची माझी तयारी आहे. औपचारिक निमंत्रण देण्याचा प्रश्‍नच येत नाही. ज्यांना चर्चा करायची आहे, त्यांनी स्वत: पुढे यावे. मी नेहमी खुल्या मनाने याठिकाणी येतो. ज्याच्याबरोबर चर्चा केली गेली पाहिजे, अशा कोणत्याही पक्षकारास चर्चेतून बाहेर ठेवण्याचा सरकारचा विचार नाही.

जम्मू-काश्‍मीरमधील 35 ए कलमाबाबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, सरकारने यापूर्वी आणि आताही या मुद्द्यावरून न्यायालयात जाण्यासाठी कधीही पुढाकार घेतलेला नाही. राज्य सरकारवरच याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना येथील सरकार काश्‍मिरी जनतेच्या भावभावनांचा विचार न करता कुठलेही पाऊल उचलणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

जम्मू-काश्‍मीरच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, यासाठी पंतप्रधान विकास निधीच्या माध्यमातून 1 लाख कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. भविष्यातही शक्‍य ती मदत पुरवण्यात येईल, असे आश्‍वासनही राजनाथसिंह यांनी दिले.

पाकिस्तान सातत्याने गोळीबार करून भारतीय चौक्‍या आणि गावांना लक्ष्य करत आहे. मात्र, आज किंवा उद्या त्यांना शस्त्रसंधीचा भंग थांबवावा लागेल, असे राजनाथसिंह यांनी आज स्थलांतर केलेल्या सीमेवरील गावकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान सांगितले. पाकिस्तान दीर्घकाळापासून सीमेवरील गावांवर तोफगोळ्यांचा मारा करत आहे, असे नमूद करून भारताकडून पहिली गोळी झाडली जाणार नाही. मात्र, जर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला, तर भारत आपल्या गोळ्या मोजणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: jammu-kashmir news Amendment in Kashmir: Rajnath Singh