बारामुल्लात हिज्बुलच्या मॉड्यूलचा पर्दाफाश

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

तरुणांना दहशतवादासाठी प्रेरित करण्याचे असले प्रकार रोखण्यासाठी त्यांच्या पालकांनी तसेच, येथील नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना मदत करावी. त्यानंतर याला आळा बसेल.
- मीर इम्तियाज हुसेन, वरीष्ठ पोलिस अधीक्षक

तिघांना अटक; पोलिस, लष्कर, सीआरपीएफची संयुक्त कारवाई

श्रीनगर: हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्यूलचा आज पोलिसांनी पर्दाफाश केला. बारामुल्ला जिल्ह्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करणाऱ्या तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हिज्बुलचे काही दहशतवादी येथील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस दलाने '29-राष्ट्रीय रायफल्स' व "सीआरपीएफ'च्या जवानांच्या साथीने बेहरामपोरा येथे ही कारवाई करत तिघांना अटक केली. वसीम अहमद मीर (अंदरगम पट्टन), उमेर हसन राठर व अकीफ हुसेन राठर (अचलबल, सोपेर) अशी त्यांची नावे आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक मीर इम्तियाज हुसेन यांनी दिली आहे.

हिज्बुलचा कमांडर परवेझ वणी याच्याकडे येथील नेटवर्कची धुरा असून, तरुणांना दहशतवादाच्या खाईत ढकलल्याबरोबरच कारवायांसाठी आवश्‍यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे कामही हा गट करत असे. पोलिसांनी त्यांच्याकडून चिनी बनावटीचे दोन पिस्तूल व इतर साहित्य जप्त केले असून, आपण हिज्बुलसाठी काम करत असल्याची कबुलीही त्यांनी चौकशीदरम्यान दिली असल्याचे हुसेन यांनी सांगितले.

Web Title: jammu-kashmir news hijbul commander killed in baramulla