सुरक्षा धोरणावर उमर यांचे प्रश्‍नचिन्ह

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

"सर्जिकल'बाबत पर्रीकरांच्या विधानानंतर टीका

श्रीनगर: केवळ अवमानजनक प्रश्‍न विचारल्यामुळे "सर्जिकल स्ट्राइक' केल्याच्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानानंतर जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्राच्या सुरक्षा धोरणावर टीका केली आहे.

"सर्जिकल'बाबत पर्रीकरांच्या विधानानंतर टीका

श्रीनगर: केवळ अवमानजनक प्रश्‍न विचारल्यामुळे "सर्जिकल स्ट्राइक' केल्याच्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानानंतर जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्राच्या सुरक्षा धोरणावर टीका केली आहे.

नियंत्रण रेषा ओलांडत पाकिस्तानवर "सर्जिकल स्ट्राइक' करण्याची योजना 15 महिने आधीच आखली होती, असे मनोहर पर्रीकर यांनी काल गोव्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. यावर टीका करताना उमर यांनी ट्विटरवरून आश्‍चर्यही व्यक्त केले. "सर्जिकल स्ट्राइक आणि उरी हल्ल्याचा काहीच संबंध नव्हता. मंत्र्यांना अवमानजनक प्रश्‍न विचारला म्हणून या कारवाईची आखणी केली. याला काय म्हणावे?', असे उमर यांनी म्हटले आहे. पत्रकाराच्या प्रश्‍नामुळे पाकिस्तानबरोबरील संबंध बिघडविण्यासाठी चिथावणी मिळू शकते काय? योग्य सुरक्षा धोरण आखून केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण करणे अपेक्षित आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

म्यानमारमधील कारवाईनंतर केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करी अधिकारी असलेले राज्यवर्धनसिंह राठोड हे त्याबाबतची माहिती पत्रकारांना सांगत होते. त्या वेळी एका पत्रकाराने, "अशी कारवाई पाकिस्तानच्या सीमेवर करण्याची हिंमत आणि क्षमता आहे काय?' असा प्रश्‍न विचारला होता. याबाबत काल (ता. 30) एका कार्यक्रमात बोलताना पर्रीकर म्हणाले, ""राठोड यांना विचारलेला प्रश्‍न मी काळजीपूर्वक ऐकला आणि योग्य वेळी उत्तर देण्याचा निश्‍चय केला. जवानांना प्रशिक्षण देऊन काही साहित्य तातडीने खरेदी केले. 29 सप्टेंबरला पाकिस्तानवर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची सुरवात जून 2015 लाच झाली होती.''

Web Title: jammu-kashmir news surgical strike and omar abdullah